PHOTOS: फुटबॉलने बेरोजगारीला 'किक' मारणारी तरूणाई; स्वतःचे नशीब लिहिणाऱ्या भारतातील गावाने वेधले लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2022 05:38 PM2022-11-29T17:38:34+5:302022-11-29T17:43:11+5:30

सध्या कतारच्या धरतीवर फिफा विश्वचषकाचा थरार रंगला आहे. फुटबॉलच्या या स्पर्धेचा प्रभाव संपूर्ण जगावर पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.

फिफा विश्वचषकात भारतीय संघ सहभागी होत नसला तरी भारतात बनवलेले फुटबॉल आपला ठसा नक्कीच उमटवत आहेत. हजारो लोकसंख्या असलेल्या एका गावाने जगासमोर एक उत्तम उदाहरण ठेवले आहे. कारण या गावात घरोघरी फुटबॉल बनवला जातो. लक्षणीय बाब म्हणजे या गावात जवळपास 3,800 घरे आहेत आणि प्रत्येक घरातील सदस्य फुटबॉल बनवण्यात मग्न असतात.

खरं तर हे गाव फुटबॉलचे गाव म्हणून खूप प्रसिद्ध झाले आहे. हे गाव उत्तर प्रदेशातील मेरठपासून चाळीस किलोमीटर अंतरावर असून याचे नाव सिसौला असे आहे. या गावात जवळपास 3,800 घरे आहेत. विशेष बाब म्हणजे या गावात एकही तरुण बेरोजगार नाही. येथील प्रत्येक तरूणाच्या हाताला काम आहे. या गावात फुटबॉलसाठी वापरल्या जाणार्‍या कच्च्या मालाची कापणी केली जाते आणि काही ठिकाणी शिवणकाम केले जाते.

दरम्यान, या गावातील एकही तरूण रोजगारासाठी बाहेर जात नाही. कारण या गावातील प्रत्येक घर फुटबॉल बनवण्यात मग्न आहे. या परंपरेला कोरोनाने देखील खंडित केले नाही. या गावातील लोकांनी कधीही बेरोजगारी पाहिली नाही. स्वतःच्या पायावर उभे राहून ते स्वतःचे नशीब लिहणारी लोकं म्हणून पंचक्रोशीत त्यांची ओळख आहे. महिला देखील येथे फुटबॉल बनविण्याच्या कामात गुंतल्या आहेत.

खासकरून या गावातील तरूणाई फुटबॉलच्या साहाय्याने बेरोजगाईला किक मारत असल्याचे पाहायला मिळते. येथील लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आदर्श मानतात. तरुणांचे म्हणणे आहे की, पीएम मोदी नेहमीच स्वावलंबी होण्याबाबत बोलत असतात. त्यामुळेच त्यांचे गाव आजपासून नाही मागील अनेक वर्षांपासून स्वावलंबी आहे.

या गावाशिवाय मेरठच्या परिसरात इतरही अनेक गावे आहेत, जिथे चामड्याचा उद्योग वाढीस लागला आहे. कुठे शूज बनवले जातात तर कुठे पर्स, बॅगचे बेल्ट, ग्लोब, जॅकेट वगैरे बनवले जातात. ग्रामस्थांची ही तळमळ पाहून आता उद्योग विभागाकडूनही चामड्याच्या क्लस्टरबाबत प्रयत्न सुरू आहेत. याठिकाणी सर्व साधने व सुविधा मिळाव्यात यासाठी विभाग युद्धपातळीवर काम करत आहे. मेरठचे फुटबॉल व्हिलेज खरोखरच बेरोजगारीला लाथ मारताना दिसत आहे.