धक्कादायक! शेतकरी आंदोलनातले अनेक लोक बेपत्ता; ‘त्या’ ११५ जणांची यादी केली जारी

By प्रविण मरगळे | Published: February 3, 2021 03:25 PM2021-02-03T15:25:32+5:302021-02-03T15:31:07+5:30

गेल्या २ महिन्यापासून दिल्लीत शेतकऱ्यांनी कृषी विधेयकाविरोधात आंदोलन पुकारलं आहे. या आंदोलनानला २६ जानेवारी रोजी हिंसक स्वरुप प्राप्त झालं, काही आंदोलकांनी थेट लाल किल्ल्यात प्रवेश करत त्याठिकाणी धर्मध्वज फडकावला, या हिंसक आंदोलनात ८९ पोलीसही जखमी झाले.

२६ जानेवारीला शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन केले होते, यावेळी पोलिसांनी दिलेल्या मार्गातून जाण्याऐवजी काही शेतकरी लाल किल्ल्याजवळ पोहचले, याठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला, परंतु आंदोलकांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचाही प्रयत्न केला.

या हिंसक आंदोलनानंतर पोलिसांनी एकीकडे शेतकऱ्यांमध्ये हिंसा पसरवणाऱ्यांविरुद्ध कारवाईला सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे आंदोलनात सहभागी असणारे १०० हून अधिक लोक बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत सध्या बेपत्ता शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत .

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ११५ लोकांची यादी जारी केली आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन बेपत्ता शेतकऱ्यांना लवकरात लवकर शोधावं अशी मागणी लावून धरली आहे.

अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, मागील काही दिवसांपासून आम्ही अनेक लोकांना संपर्क साधला, यातील अनेक लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनासाठी दिल्लीत आले परंतु घरी परतले नाहीत, त्यांचा कोणताचा ठावठिकाणा नाही, हे लोक बेपत्ता आहेत.

ज्यांच्या घरातील लहान मुलं आणि मोठी माणसं सापडत नसतील अशा कुटुंबाचं दुखं मी समजू शकतो, हिंसक आंदोलनामुळे दिल्लीच्या विविध जेलमध्ये अटक करण्यात आलेल्यांची यादी बनवली आहे. यात ११५ नावांचा समावेश आहे. ज्यात वय आणि वडिलांचे नावही लिहिलं आहे.

ज्यांच्या घरातील लोक सापडत नाही, त्यांनी ही यादी एकदा वाचून घ्यावी, जेणेकरून आपल्या कुटुंबातील कोणीही या असेल तर तो कधी अटक झाला आणि कोणत्या जेलमध्ये आहे याची संपूर्ण माहिती मिळू शकेल असं आवाहन मुख्यमंत्री अरविंज केजरीवाल यांनी केलं आहे.

दरम्यान, शेतकऱ्यांना भडकवण्याचा आरोप ज्या दीप सिद्धूवर ठेवण्यात आला असून तो अद्याप फरार आहे. दीप सिद्धू याच्यासह इतर सहा जण देखील फरार आहेत. या सर्वांच्या अटकेसाठी दिल्ली पोलिसांनी आता बक्षीस जाहीर केलं आहेत. यामध्ये दीप सिद्धूसह चार जणांची माहिती देणाऱ्याला प्रत्येकी एक लाखाचं रोख बक्षीस तर उर्वरित तीन जणांची माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 50,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे.

भारतीय किसान यूनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आरोप लावला आहे की, दीप सिद्धू भाजपाचा माणूस आहे. लाल किल्ल्यावरील घटनेनंतर दीप सिद्धूची गुरदासपूरचे भाजपा खासदार सनी देओल यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाला होता, त्यानंतर सनी देओलने ट्विट करून दीप सिद्धूचा माझ्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही असं स्पष्टीकरण दिलं होतं

दीप सिद्धूने व्हिडीओत सनी देओलने लोकांचा विश्वासघात केला आहे. मी माझ्या आयुष्यातील 20 दिवस सनी देओल माझा भाऊ आहे म्हणून प्रचार केला, भाजपासाठी मतदान मागितलं नव्हतं, मी आरएसएस, भाजपाचा माणूस आहे असं सांगितलं जात आहे, सनी देओल सोशल मीडियात पोस्टवर पोस्ट करत आहेत असं सांगितलं होतं. मी पंजाब आणि येथील लोकांचा आवाज उठवला, पण माझ्यावर गद्दारीचा शिक्का मारण्यात आला असं दीप सिद्धूने म्हटलं आहे.