भाजपाला मोठा धक्का?; शिवसेनेपाठोपाठ आणखी एक जुना मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 09:00 AM2020-06-25T09:00:24+5:302020-06-25T09:08:15+5:30

महाराष्ट्रात शिवसेनेनं जुना साथीदार असलेल्या भाजपाची साथ सोडून काँग्रेस, राष्ट्रवादीचा हात धरला. यानंतर आता भाजपाचा आणखी एक जुना मित्र पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधून (एनडीए) बाहेर पडण्याच्या तयारीत आहे.

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिरोमणी अकाली दलानं एनडीएला रामराम करण्याचा इशारा दिला आहे.

आमच्या दृष्टीनं मंत्रिपद आणि आघाडी शेतकऱ्यांपेक्षा मोठी नाही. आम्ही तो त्याग करू शकतो, अशी भूमिका शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंधनाचे दर सातत्यानं वाढत आहेत. त्यावरून सुखबीर सिंह बादल यांनी नाराजी व्यक्त केली.

'पंजाब सरकार डिझेलचा दर १० रुपयांनी कमी करण्यास तयार असेल, तर आम्ही पंजाबमधील सगळ्या पक्षांसह इंधनावरील कर कमी करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत केंद्र सरकारविरोधात धरणं आंदोलन करण्यात तयार आहोत,' असा पवित्रा बादल यांनी घेतला आहे.

गेल्या १८ दिवसांपासून इंधनाचे दर वाढत आहेत. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचं बादल म्हणाले.

मजुरीत वाढ झाल्यानं आधीच शेतकरी अडचणीत आला आहे. त्यात आता डिझेलचे दर वाढल्यानं शेतकऱ्यांसमोरच्या समस्या आणखी वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र सरकारनं याचा गांभीर्यानं विचार करायला हवा, असं बादल यांनी म्हटलं.

शेतमालाची खरेदी आणि हमीभाव याबद्दल देण्यात आलेलं आश्वासन सरकारकडून पाळलं न गेल्यास आम्ही आघाडीची किंवा मंत्रिपदाची फिकीर करणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही. मग त्यासाठी कितीही मोठा त्याग करावा लागला, तरी त्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली.

याआधी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातही शिरोमणी अकाली दलानं भाजपापेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. सुधारित नागरिकत्व कायद्यात मुस्लिमांचाही समावेश करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.

शिरोमणी अकाली दलाचे लोकसभेत २, तर राज्यसभेत ३ खासदार आहेत. पंजाबच्या विधानसभेत पक्षाचे १५ आमदार आहेत.