आम्हाला वाचवा! गुजरातमधल्या तरुणाची थेट राज ठाकरेंकडे मागणी; नेमकं काय प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 12:09 PM2023-03-27T12:09:44+5:302023-03-27T12:14:38+5:30

मागील वर्षीच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची प्रखर भूमिका घेत मशिदीवरील अनधिकृत भोंग्याचा विषय हाती घेतला होता. त्यानंतर राज्यभरात ठिकठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. भोंग्यासमोर हनुमान चालीसा लावण्याचं आवाहन राज यांनी केले होते.

त्यानंतर यंदाच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनधिकृत बांधकामाचा मुद्दा हाती घेत माहिम येथील समुद्रात होणाऱ्या बेकायदेशीर ढाचा पाडण्यास सरकारला भाग पाडलं. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर अवघ्या १४ तासांत ही कारवाई करण्यात आली.

राज ठाकरे हे हिंदुत्वाची कठोर भूमिका घेतायेत असे चित्र सातत्याने पुढे येत आहे. त्यातूनच गुजरातमधल्या एका तरूणाने राज ठाकरेंना ट्विट करून आम्हाला वाचवा अशी विनंती केली आहे. त्याचे हे ट्विट सध्या व्हायरल होत आहे.

या तरुणाने एका सॅटेलाईट इमेजचा फोटो ट्विट करत म्हटलंय की, हा अहमदाबादचा चांडोळा तलाव आहे जो आता हळूहळू नामशेष झाला आहे. इथे बाहेरून आलेल्या मुस्लिमांनी बेकायदेशीर अतिक्रमण करून तलाव गिळंकृत केलाय हे संपूर्ण गुजरातला माहिती आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालतात आणि अनेक गुन्हेगारही याठिकाणी लपून बसतात. याठिकाणी एक नव्हे तर अनेक मशिदी आणि मदरसे अवैधपणे बांधण्यात आले आहेत असं या तरूणाने सांगितले.

इतकेच नाही तर आजपर्यंत एकाही गुजराती नेत्याने याविरोधात आवाज उचलण्याची हिंमत दाखवली नाही. निदान तुम्ही एक ट्विट करा म्हणजे इथे राहणाऱ्या आमच्यासारख्या कमी होत चाललेल्या हिंदूंचे भविष्य वाचेल असं या तरूणाने राज ठाकरेंकडे मागणी केली आहे.

अलीकडेच राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात हिंदूंनी दक्ष राहा असं आवाहन केले होते. या सभेत राज ठाकरे यांनी सांगली आणि माहिम येथील दोन विषय फोटो, व्हिडिओसह सभेत दाखवत सरकारला इशारा दिला होता.

माहिमच्या समुद्रात अवैधपणे नवीन हाजीअली बनवण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता. सभेत राज ठाकरे यांनी याबाबतचा व्हिडिओही दाखवला. त्यानंतर जर यावर कारवाई झाली नाही तर त्याचशेजारी मोठे गणपती मंदिर बांधू असा इशारा त्यांनी सरकारला दिला होता.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर तातडीने प्रशासकीय हालचाली सुरू झाल्या. रातोरात जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबत पडताळणी करून दुसऱ्या दिवशी सदर जागेची मॅपिंग करण्यात आली. त्यानंतर काही तासांत हातोडे, जेसीबी घेऊन याठिकाणचे बांधकाम हटवण्यात आले.

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने तातडीची पावले उचलत कारवाई केल्याची बातमी सर्वच माध्यमांमध्ये झळकली. सरकारच्या या कारवाईची मनसेने स्वागत केले तर ही मॅच फिक्सिंग असल्याचा दावा विरोधकांनी केला.