यूपीत RLD, आंध्र प्रदेशात TDP तर महाराष्ट्रात MNS; भाजपाची रणनीती यशस्वी होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 03:43 PM2024-02-07T15:43:30+5:302024-02-07T15:54:19+5:30

२०२४ च्या निवडणूक मैदानात बाजी मारण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झालेत. त्यात वरिष्ठ नेतृत्वाने स्थानिक प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्यासाठी पुढाकार घेतला आहे. भाजपाची पूर्ण तयारी पाहता विरोधी पक्षांची INDIA आघाडीत एकापाठोपाठ एक धक्के बसतायेत. सुरुवातीला बिहारमध्ये नीतीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडून भाजपासोबत सत्तेत आले.

त्यानंतर पश्चिम बंगालमध्येही ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला बाजूला केले. त्यात अरविंद केजरीवाल आणि त्यांचा आप पक्ष पंजाबमध्ये जागावाटपावरून आक्रमक होतोय. आता उत्तर प्रदेशातही आरएलडी आणि आंध्र प्रदेशात टीडीपी, महाराष्ट्रात मनसे यांना सोबत घेण्याची तयारी भाजपाने केली आहे.

विरोधी आघाडीत फूट पडताना दिसते तर भाजपा एक एक पाऊल पुढे टाकताना दिसून येते. जास्तीत जास्त प्रादेशिक पक्षांना एनडीएसोबत आणण्यासाठी हालाचाली सुरु झाली आहे. इतकेच नाही तर विरोधी पक्ष आणि दिग्गज नेत्यांना भाजपासोबत आणण्यासाठी एक कमिटी बनवण्यात आलीय. ही कमिटी विरोधी पक्षातील नेत्यांना एनडीएसोबत आणण्याची रणनीती आखत आहे.

भाजपा स्वत:च्या फायद्यापेक्षा विरोधी आघाडी उद्ध्वस्त करण्यावर भर देत आहे. त्यामुळे २ दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी संसदेत ३७० जागा जिंकू असा दावा केला. पंतप्रधानांचा हा दावा पाहता भाजपा राजकीय समीकरणे आणि एनडीए आघाडीची ताकद वाढवून पूर्ण ताकदीनिशी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे दिसून येते.

महाराष्ट्राचं बोलायचे झाले तर भाजपा याठिकाणी मजबूत ताकदीने पुढे जाताना दिसत आहे. इथं आधी शिवसेनेत फूट पडली, एकनाथ शिंदे समर्थक आमदारांसह एनडीएत सहभागी झाले आणि राज्यात सत्तांतर घडवले. त्यानंतर अजित पवारही ३० हून अधिक आमदारांसह एनडीएमध्ये दाखल झालेत. महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादीत फुटीमुळे भाजपाला थेट फायदा झाला.

उद्धव ठाकरे-शरद पवार यांचं ताकद कमी करण्यास भाजपाला यश आले. तर आता दुसरीकडे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही भाजपा प्रणित एनडीए आघाडीत सहभागी होण्याची शक्यता आहे. मंगळवारी मनसे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सरकारी निवासस्थानी बैठक झाली. त्यात आगामी निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.

सूत्रांनुसार, राज ठाकरे यांनी जागावाटपाची जबाबदारी पक्षातील ३ प्रमुख नेत्यांना सोपवली आहे. मनसे-भाजपा यांच्यात पडद्याआड बोलणी सुरू झाली आहेत. जर भाजपा-मनसे युती झाली तर सर्वाधिक फायदा हा मनसेला होणार आहे. कारण सध्या मनसे महाराष्ट्रात मर्यादित ठिकाणी असून संघटनाही कमकुवत झाली आहे.

यातच काही वृत्तांनुसार, उद्धव ठाकरेही एनडीएसोबत येण्यास इच्छुक आहेत असं बोलले जाते. काही भाजपा नेते तसा दावाही करत आहेत. इंडिया आघाडीसोबत लोकसभा निवडणुकीला सामोरे जावं असं उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना वाटत नाही. त्यात इंडिया आघाडीच्या जागावाटपात ठाकरे गटाला १८ जागा सोडण्यासही इतर पक्ष तयार नाहीत.

२०१९ मध्ये उद्धव ठाकरे आणि भाजपा यांनी एकत्रित निवडणूक लढवली होती. त्यातून ठाकरे गटाला १८ जागा मिळाल्या होत्या. मात्र आता यातील बहुतांश खासदार हे एकनाथ शिंदेंसोबत एनडीएमध्ये सहभागी झालेत. त्यामुळे ठाकरे गटाची ताकद कमी झाली असून त्यांच्याकडे सक्षम उमेदवार नसल्याचं महाविकास आघाडीतले पक्ष बोलत आहेत.

महाराष्ट्रात एकूण ४८ लोकसभेच्या जागा आहेत. त्यात २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा आघाडीला ४१ जागांवर विजय मिळाला होता. तर यूपीए आघाडीला ५ जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यात भाजपाकडे २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी ४ आणि काँग्रेसनं एक जागा जिंकली होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. ठाकरे-पवारांची ताकद किती उरली आहे हे आगामी निवडणुकीच्या निकालानंतर दिसून येईल.