जीव वाचवण्यासाठी १८ तास संघर्ष! पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने भारत सरकारवर ठोकला १०० कोटींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 11:17 IST2026-02-24T11:10:40+5:302026-02-24T11:17:23+5:30

८ सप्टेंबर २०२५ रोजी नेपाळमध्ये सरकारविरोधात Gen Z ने आंदोलन केले होते. या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी जमाव हिंसक बनला. सरकारी इमारती, हॉटेल, दुकाने आंदोलनकर्त्यांच्या निशाण्यावर होती. त्यात राजधानी काठमांडू येथील हॉटेल हयात रिजेंसीलाही टार्गेट करण्यात आले. चारी बाजुने गोळ्यांचा आवाज आणि आगीच्या भयंकर ज्वाला होत्या.

याच हॉटेलमध्ये भारतातील गाझियाबाद येथून गेलेले रामबीर सिंह गोला आणि त्यांची पत्नी राजेश देवी थांबले होते. हे दोघे चौथ्यांचा नेपाळला गेले होते. प्रत्येकवेळी दोघे एकत्र जायचे आणि एकत्र परतायचे परंतु यावेळी रामबीर सिंह यांच्यावर पत्नीचा मृतदेह घेऊन भारतात परतायची वेळ आहे. नेपाळमधील हिंसक आंदोलनात पत्नीचा मृत्यू झाला.

या घटनेनंतर ५ महिन्यांनी आता २७ जानेवारी २०२६ रोजी रामबीर सिंह यांनी दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या याचिकेतून रामबीर यांनी पत्नीच्या मृत्यूसाठी भारतीय दूतावास कार्यालय, भारताचे परराष्ट्र विभाग आणि हॉटेल हयात रिजेंसीला जबाबदारी धरत त्यांच्याकडे १०० कोटींची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. रामबीर यांनी म्हटलं की, जेव्हा आंदोलन सुरू झाले तेव्हा हॉटेल स्टाफने आम्हाला सुरक्षेची हमी दिली. परंतु जेव्हा आग लागली तेव्हा सगळ्यात आधी स्टाफ पळून गेला. भारतीय दूतावास कार्यालयाला कित्येक तास कॉल केले परंतु कुणीही फोन उचलले नाहीत. माझ्या पत्नीचा मृत्यू नैसर्गिक नाही तर हॉटेल, भारतीय दूतावास आणि भारतीय परराष्ट्र खात्याच्या निष्काळजीपणामुळे झाला आहे असा आरोप त्यांनी केला.

गाझियाबादमध्ये राहणाऱ्या रामबीर सिंह गोला यांची कहाणी एका ट्रेजिडी सिनेमापेक्षा कमी नाही. रामबीर यांनी एका मुलाखतीत संपूर्ण घटनाक्रम सांगितला. ७ सप्टेंबरला रामबीर सिंह पत्नीसह काठमांडूला पोहचले होते. दुसऱ्याच दिवशी ८ सप्टेंबरला नेपाळ सरकारविरोधात जेन जी आंदोलनकर्त्यांनी आंदोलन उभे केले. ९ सप्टेंबरला आम्हाला काठमांडूहून मिथिलासाठी निघायचे होते.

सकाळी आम्ही निघायची तयारी केली परंतु आंदोलन हिंसक बनल्याची माहिती आम्हाला मिळाली. हॉटेल खाली आंदोलकांनी आग लावणे सुरू केले होते. हॉटेल स्टाफने आम्हाला चौथ्या मजल्यावर शिफ्ट केले आणि इथे तुम्ही सुरक्षित आहात असं सांगितले. फाईव्ह स्टार हॉटेल आहे त्यामुळे त्यांनी जबाबदारीने हे सांगितल्याचे आम्हाला वाटले असं रामबीर यांनी म्हटलं. जेव्हा हिंसा भडकली तेव्हा आम्ही जनरल मॅनेजर आणि दुसऱ्या स्टाफला आवाज दिला परंतु सर्व गायब झाले होते. हॉटेलचा सर्व स्टाफ निघून गेला होता. मी आणि माझी पत्नी सकाळी ९ वाजल्यापासून हॉटेलच्या खोलीत बंद होतो. आम्ही मदतीसाठी नेपाळमधील भारतीय दूतावास कार्यालयाला ३०-४० कॉल केले परंतु एकही फोन उचलला नाही. कदाचित कुणी आम्हाला वाचवायला येईल असं वाटत होते, पण कुणीच आले नाही अशी नाराजी रामबीर सिंह यांना बोलून दाखवली.

आम्ही संपूर्ण दिवस त्या खोलीत बंद होतो, चारी बाजुने गोळ्यांचा आवाज होता, ठिकठिकाणी आग लावली होती. संध्याकाळी ७ वाजता आमच्या खोलीच्या दरवाजाच्या खालील बाजूने धूर येऊ लागला. आम्हाला जीव गुदमरू लागला. आगीमुळे आम्हाला सिढीने खाली जाणे शक्य नव्हते. आम्ही खिडकीचे पडदे काढले आणि त्याची रस्सी बनवली. चौथ्या मजल्यावरून आम्ही खाली उतरण्याचा निर्णय घेतला.

पत्नी हे धाडस करायला तयार नव्हती. तुम्ही पुढे जा, तुमचा जीव वाचेल असं ती म्हणत होती. परंतु मी ऐकले नाही दोघांनीही एकत्र जायचे ठरवलं. रात्री ८.४५ ते ९ या काळात आम्ही दोघेही खाली उतरत होतो तेव्हा काही अंतरावर पत्नीचा हात सुटला आणि ती खाली पडली. तिला गंभीर दुखापत झाली. परंतु त्यावेळी तिने मला काही सांगितले नाही असं रामबीर यांनी म्हटलं.

आम्ही खाली उतरलो, चहुबाजूने आग होती. गोळ्या सुरू होत्या. आम्हाला वाचवणारे कुणी नव्हते. अनेक लोक अडकले होते. मिलिट्रीच्या गाड्या पाहून आम्ही मदतीसाठी विनवणी केली परंतु त्यांनीही ऐकले नाही. मोठ्या अडचणीनंतर मी माझ्या पत्नीला एका गाडीत चढवले. मला चढता आले नाही. तिथून गाडी निघून गेली. संपूर्ण रात्र हिंसाचार, गोळ्यांच्या आवाजात मी एकटाच पडलो होतो. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मला पत्नी कुठे आहे हे कळले नाही. शोधाशोध सुरू केल्यानंतर मला दुपारी १.४५ वाजता पत्नीचा सुगावा सापडला.

मिलिट्रीच्या एका अधिकाऱ्याने काठमांडू येथे हॉस्पिटलमध्ये त्या भरती आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहे असं सांगितले. परंतु जेव्हा मी त्या हॉस्पिटलला पोहचलो तिथे पत्नीच्या मृत्यूची बातमी मिळाली. जर भारतीय दूतावास कार्यालयाने आमचा फोन उचलला असता तर आज माझी पत्नी जिवंत असती, आम्ही यूपीच्या सीएमओ कार्यालयाही फोन केला परंतु तिथूनही मदत मिळाली नाही असा आरोप पतीने केला आहे.

पत्नीच्या मृत्यूनंतरही पतीसोबत आर्थिक फसवणूक झाली. जवळपास दीड लाख रूपये पोस्टमोर्टमसाठी आणि २५ हजार मृतदेह ठेवण्यासाठी मागण्यात आले. त्यानंतर १२ सप्टेंबरला दीड दोन लाख देऊन रुग्णवाहिका बुक करून रामबीर पत्नीचा मृतदेह घेऊन भारतात परतले. इतर देशात भारताच्या एम्बेसी अखेर काय करतात, हिंसेच्या वेळी त्यांनी निष्काळजीपणा दाखवला. याची जबाबदारी निश्चित केली पाहिजे असंही रामबीर सिंह यांनी सांगितले.