शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

आईने सोन्याच्या बांगड्या विकल्या, लेकाने प्लॅटफॉर्मवर बसून स्वप्न साकार केलं, झाला मोठा सायंटिस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2026 16:31 IST

1 / 12
सोशल मीडियावर सध्या एक अशी गोष्ट व्हायरल होत आहे, ज्याने मेहनत, आईचा त्याग आणि ध्येयवेड्या जिद्दीचं खरं दर्शन घडवलं आहे. ही गोष्ट अशा एका व्यक्तीची आहे, ज्याने कॉलेजच्या दिवसांत अभ्यासासाठी ना कोणती लायब्ररी शोधली, ना कोचिंग क्लास तर एका शांत रेल्वे प्लॅटफॉर्मलाच आपला क्लासरूम बनवलं.
2 / 12
तामिळनाडूच्या प्लॅटफॉर्मवर बसून केलेल्या अभ्यासाने पुढे त्यांना एक यशस्वी सायंटिस्ट बनवलं. हा प्रेरणादायी प्रवास खुद्द डॉ. ए. वेलुमणी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो आता लाखो लोकांना मेहनत आणि शिस्तीचा खरा अर्थ समजावून सांगत आहे.
3 / 12
डॉ. वेलुमणी यांनी सांगितलं की, १९७४ ते १९७८ दरम्यान ते कोईम्बतूरच्या श्री रामकृष्ण मिशन विद्यालयात शिकत होते. त्यावेळी त्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.
4 / 12
शहरातील कॉलेजमध्ये शिक्षण आणि हॉस्टेलचा खर्च पेलणं त्यांना शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी असं कॉलेज निवडलं जिथे फी आणि राहण्याचा खर्च कमी होता. हॉस्टेलची फी भरणंही कठीण असल्याने ते शहरातील एका सरकारी मोफत हॉस्टेलमध्ये राहू लागले. मात्र कॉलेजला जाण्या-येण्याचा खर्चही त्यांच्यासाठी मोठा होता.
5 / 12
बसने रोजचा प्रवास करणं महाग पडायचं म्हणून त्यांनी पॅसेंजर ट्रेनचा आधार घेतला, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा पास खूप स्वस्त मिळायचा. या निर्णयामुळे त्यांची दिनचर्या पूर्णपणे बदलली.
6 / 12
सकाळी खूप लवकर ट्रेन पकडावी लागायची आणि संध्याकाळी उशिरा घरी परतावं लागायचं. कॉलेज सुटल्यानंतर त्यांच्याकडे रोज अनेक तास मोकळे असायचे. वेलुमणी यांनी लिहिलं की, 'मी त्या मोकळ्या तासांमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मवर बसून गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्राचा अभ्यास करायचो.'
7 / 12
सुमारे १००० दिवस आणि अंदाजे ६००० तास त्यांनी प्लॅटफॉर्मवर अभ्यास केला. हीच मेहनत पुढे त्यांना 'भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात' (BARC) नोकरी मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरली.
8 / 12
वेलुमणी यांनी हे देखील सांगितलं की, त्या दिवसांत त्यांची आई घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती आणि तिचे उत्पन्न खूप कमी होते. कुटुंबावर ओझं पडू नये म्हणून त्यांनी सर्व त्रास सहन केला.
9 / 12
एकदा तर त्यांच्या आईने कॉलेजची फी भरण्यासाठी स्वतःच्या सोन्याच्या बांगड्या विकल्या होत्या. डॉ. वेलुमणी यांच्या मते, त्यांच्या यशामागे चार गोष्टी होत्या—संयम, मेहनत, साधेपणा आणि शिस्त.
10 / 12
पोस्टच्या शेवटी त्यांनी एक भावूक गोष्ट लिहिली आहे. त्यांनी सांगितलं की, नंतर ते आपल्या पत्नीला त्याच रेल्वे प्लॅटफॉर्मवर घेऊन गेले आणि म्हणाले, 'इथूनच एक सायंटिस्ट घडला होता.'
11 / 12
या पोस्टसोबत वेलुमणी यांचा एक फोटो देखील आहे, ज्यामध्ये ते रेल्वे प्लॅटफॉर्मवरील एका बाकावर बसले आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांची पत्नीही आहे.
12 / 12
सोशल मीडियावर लोकांनी या गोष्टीचं भरभरून कौतुक केलं. एका युजरने लिहिलं की, 'ही गरिबीची नाही, तर ध्येय आणि मेहनतीची गोष्ट आहे.' दुसऱ्याने म्हटलं की, 'अशा गोष्ट आपल्याला शिकवतात की यश हळूहळू मिळते, एका रात्रीत नाही.' ही गोष्ट आजच्या तरुणांसाठी मोठी शिकवण ठरली आहे.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीSocial Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडिया