Rahul Gandhi: कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी टी शर्टवर, दिल्लीत आईच्या मायेची उब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 03:22 PM2022-12-24T15:22:45+5:302022-12-24T16:04:01+5:30

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं आता राजधानी दिल्लीत पाऊल ठेवलं आहे. हरियाणाच्या फरिदाबाद येथून भारत जोडो यात्रा आज राजधानी दिल्लीत दाखल झाली. यावेळी जयराम रमेश आणि पवन खेरा पहाटेच शहरातील रस्त्यांवर दिसले.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेनं आता राजधानी दिल्लीत पाऊल ठेवलं आहे. हरियाणाच्या फरिदाबाद येथून भारत जोडो यात्रा आज राजधानी दिल्लीत दाखल झाली. यावेळी जयराम रमेश आणि पवन खेरा पहाटेच शहरातील रस्त्यांवर दिसले.

निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे योगेंद्र यादव हेही यात्रेत होते. तसेच अभिनेते कमल हसन देखील या यात्रेत सामील होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यासाठी, ते दिल्लीत दाखलही झाले आहेत.

राहुल गांधींच्या या यात्रेचा आज १०८ वा दिवस असून सकाळी ११ वाजता ही यात्रा जयदेव आश्रम, आश्रम चौक येथे पोहोचणार आहे. त्यानंतर, संध्याकाळी ५ वाजता लाल किल्ल्यावर यात्रा पोहोचणार आहे.

आज राजधानी दिल्लीत अभिनेता कमल हसन भारत जोडो यात्रेत सहभागी होणार असल्याचे समजते. कारण, गेल्याच आठवड्यात एमकेएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कमल हसन यांना राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठीचे निमंत्रिण दिले होते, अशी माहिती स्वत: कमल हसन यांनी दिली होती.

राजधानी दिल्लीत प्रवेश करण्यापूर्वी राहुल गांधी म्हणाले, आज आपण सर्वजण भारताची राजधानी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर उभे आहोत. या या यात्रेसाठी आणि देशासाठीही एक ऐतिहासिक क्षण आहे.

या संपूर्ण यात्रेदरम्यान आपण लोकांकडून खूप काही शिकलो. आम्ही त्यांच्या वेदना अनुभवल्या आणि त्यांच्या इच्छा ऐकल्या. याच बरोबर, आता भारत जोडो यात्रा हा प्रेमाचा आवाज आणि भारतातील लोकांचा संदेश दिल्लीपर्यंत घेऊन जाईल. एवढेच नाही, तर आपण माझे शब्द लिहून ठेवा, 'आपल्या द्वेषावर आमच्या प्रेमाचा विजय होईल,' असेही राहुल गांधी म्हणाले.

दिल्लीत राहुल गांधींच्या यात्रेत मोठ्या संख्येनं दिल्लीतील नेते उपस्थित आहेत. राहुल गांधी यांच्या मातोश्री सोनिया गांधी याही दिल्लीत यात्रेत सहभागी झाल्या. सोनिया गांधी स्वेटर परिधान करुन होत्या.

दिल्लीत कडाक्याची थंडी पडली असून या थंडीतही राहुल गांधी केवळ पांढऱ्या रंगाच्या टी-शर्टवर यात्रेत आहेत. त्यामुळे, सोशल मीडियावर त्यांच्या फिटनेचसं कौतुक होत आहे. तर, दुसरीकेड याच यात्रेत आई सोनिया गांधींसमवेतचा त्यांचा फोटो पाहून त्यांना मायेची उब मिळाल्याची भावनाही नेटीझन्सने व्यक्त केली आहे.

राहुल गांधी यांचे सोनिया गांधींसमवेतचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यापैकी एका फोटो राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या चेहऱ्यावर स्मीतहास्य असून राहुल गांधींनी आईंच्या गळ्यात हात घातला आहे. माय-लेकराच्या प्रेमळ नात्याचं वर्णन करणारा हा फोटो आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या भारत जोडो यात्रेला देशभरातून प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता या यात्रेवर बंदी घालण्याची मागणी भाजप खासदाराने एका पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती.

त्यानंतर, देशातील काँग्रेस नेत्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. या यात्रेत अडथळे निर्माण करण्याचे काम भाजपाने पहिल्या दिवसापासून केले. भाजपाच्या अपप्रचाराला जनतेने भीक न घालता पदयात्रेला मोठा पाठिंबा दिल्याचं काँग्रेसने म्हटलं आहे.