बापरे! कोरोनामुळे 162 नव्हे तर तब्बल 734 डॉक्टर्सनी गमावला जीव, IMAने दिली आकडेवारी; पत्रातून केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 03:36 PM2021-02-04T15:36:27+5:302021-02-04T15:47:36+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाच्या संकटात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य क्षेत्रातील सर्वच कर्मचारी आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून काम करत आहेत.

देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,07,90,183 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,54,703 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

गेल्या 24 तासांत कोरोनाचे 12,899 रुग्ण आढळून आले आहेत. तर 107 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या संकटात डॉक्टर, नर्स आणि आरोग्य क्षेत्रातील सर्वच कर्मचारी आपल्या कुटुंबीयांपासून दूर राहून काम करत आहेत.

कोरोना वॉरिअर्स दिवस-रात्र कोरोना रुग्णांची सेवा करत आहेत. मात्र य़ाच दरम्यान अनेकांना कोरोनाची लागण झाली असून काहींचा मृत्यू झाला आहे. केंद्र सरकारने देशात कोरोनाच्या संकटात 162 डॉक्टरांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.

इंडियन मेडिकल असोसिएशनने डॉक्टरांच्या मृत्यूबाबत देण्यात आलेली आकडेवारी चुकीची असल्याचं म्हटलं आहे. केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारी पेक्षा अधिक डॉक्टर्सचा मृत्यू झाल्याचा दावा IMA ने केला आहे.

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी राज्यसभेत कोरोना काळात 162 डॉक्टर्स, 107 नर्स आणि 44 आशा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. मात्र इंडियनन मेडिकल असोसिएशनने ही आकडेवारी चुकीची असल्याचं म्हटलं आहे.

इंडियन मेडिकल असोशिएशने याबाबत एक ट्विट केलं आहे. ट्विटरवरून दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळात तब्बल 734 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. मृतांपैकी 25 डॉक्टरांचे वय हे 35 वर्षांपेक्षा कमी होते.

आयएमएने यासंदर्भात एक पत्र लिहिलं आहे. आकडेवारीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच सरकारने याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी देखील केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाच्या संकटात भारत काही देशांसाठी देवदूत ठरला आहे. भारतात तयार करण्यात आलेली ऑक्सफर्ड-एस्‍ट्राजेनेका व्हॅक्‍सीन 'कोविशील्‍ड' पाठवण्यात आली आहे. जगातील सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ झाला आहे.

भारतात अत्यंत वेगाने कोरोना लसीकरण अभियान सुरू आहे. आतापर्यंत 25 लाखांहून अधिक लोकांना लस टोचण्यात आल्याची माहिती दिली आहे. सर्वप्रथम देशातील कोरोना योद्ध्यांचे लसीकरण करण्यात येत आहे.

आरोग्य सेवक, डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस यंत्रणा तसेच सैन्यदलासह सफाई कामगारांचाही समावेश आहे. तर दुसरीकडे भारत जगभरातील इतरही अनेक देशांना कोरोनाची लसीचे डोस पुरवत आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावण्याचा सल्ला दिला जातो. काही ठिकाणी मास्क न लावल्यास दंड देखील भरावा लागतो. याच दरम्यान कोरोनासारख्या व्हायरसपासून वाचण्यासाठी डबल मास्किंग म्हणजेच दोन मास्क लावा असा सल्ला आरोग्यविषयक तज्ज्ञांनी दिला आहे.

आरोग्यसंबंधी एका रिसर्च पेपरमध्ये तज्ज्ञ मोनिका गांधी आणि लिनसे मारने यांनी नागरिकांनी किमान उच्च दर्जाचा सर्जिकल मास्क किंवा दाट धाग्यांपासून बनवलेला मास्क वापरणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. दोन मास्कचा वापर केल्यामुळे व्हायरसपासून 50 ते 75 टक्के अधिक बचाव होऊ शकतो असं एका रिसर्चमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

संशोधनात सर्जिकल प्रकारच्या मास्कच्या पार्टीकल्स हटवण्याच्या क्षमतेवर अभ्यास करण्यात आला होता. सुरुवातीच्या काळात एन95 मास्कची उपलब्धता कमी असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कापडापासून तयार केलेला मास्क वापरावा, असं सांगण्यात आलं होतं.

कोरोनाच्या नव्या प्रकारामुळे नागरिक कापडाच्या मास्कचा वापर करण्याऐवजी एन95 मास्क वापरण्यावर अधिक भर देताना दिसत आहेत. सोशल डिस्टंसिंग आणि क्लारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे.