G20 साठी भारतात आलेल्या राष्ट्रप्रमुखांना PM मोदींचे स्पेशल गिफ्ट; काय आहे खास, जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 17:21 IST2023-09-12T17:13:32+5:302023-09-12T17:21:41+5:30
पीएम मोदींनी सर्व परदेशी पाहुण्यांना भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती दाखवणारे खास गिफ्ट दिले.

G20: G20 शिखर परिषदेनंतर सर्व राष्ट्रप्रमुख आपापल्या देशात परतले आहेत. हा कार्यक्रम भव्यदिव्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले. जाण्यापूर्वी पीएम मोदींनी सर्व परदेशी प्रतिनिधींना खास रिटर्न गिफ्ट दिले आहे. या सर्व भेटवस्तू भारतातील वैविध्यपूर्ण संस्कृती आणि परंपरांशी संबंधित आहेत.

एएनआय या वृत्तसंस्थेने या सर्व भेटवस्तूंचे फोटो शेअर केले आहेत. काही उत्पादने ही भारतातील शतकानुशतके जुन्या संस्कृतीशी संबंधित आहेत. ही उत्पादने त्यांच्या कारागिरी आणि गुणवत्तेसाठी जगभरात लोकप्रिय आहेत. या भेटवस्तू कुशल कारागिरांनी स्वतःच्या हातांनी बनविलेल्या आहेत. काही वस्तू आपल्या देशातील जैवविविधता दर्शवतात.

राष्ट्रप्रमुखांना शीशम लाकडापासून बनविलेल्या संदुकात या वस्तु ठेवून देण्यात आल्या आहेत. या संदुकावर तांब्याचे नक्षीकाम करण्यात आले आहे. शीशम लाकूड ताकद, टिकाऊपणा आणि त्याच्या खास रंगासाठी ओळखले जाते.

भेटवस्तूमध्ये काश्मीरातील प्रसिद्ध केशरचा समावेश आहे. काश्मीरचे केशर जगात खूप प्रसिद्ध आहे. ते बऱ्यापैकी महागही आहे. सर्व संस्कृती आणि सभ्यतांमध्ये, केशर औषधी उपयोगांसाठी ओळखले जाते. केशरमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात, जे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते.

G20 देशांच्या प्रमुखांना पंतप्रधान मोदींनी दार्जिलिंग आणि निलगिरी चहा भेट दिला आहे. पेको दार्जिलिंग आणि निलगिरी चहा खूप लोकप्रिय आहेत. दार्जिलिंग चहा पश्चिम बंगालच्या टेकड्यांमध्ये 3000-5000 फूट उंचीवर पिकवला जातो.

याशिवाय, G20 पाहुण्यांना आंध्र प्रदेशची प्रसिद्ध अराकू कॉफीही भेट म्हणून देण्यात आली आहे. आंध्र प्रदेशातील अराकू व्हॅलीमध्ये कॉफी बीन्सची लागवड केली जाते. अराकूची चव जगभरात खूप लोकप्रिय आहे.

सुंदरबन मल्टीफ्लोरा मॅन्ग्रोव्ह मधही भेट म्हणून देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरातील गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना नद्यांच्या संगमाने तयार झालेले सुंदरबन हे जगातील सर्वात मोठे सदाहरित जंगल आहे. येथील आदिवासी लोक मधमाशीपालनाचा व्यवसाय करतात. ही परंपरा सुंदरबनमधील लोकांमध्ये आजही प्रचलित आहे.

















