चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 20:14 IST2025-07-28T20:07:13+5:302025-07-28T20:14:04+5:30
Operation Mahadev : २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, हे दहशतवादी तिथून पसार झाल्याने त्यांचा शोध घेणं हे लष्करासाठी फार मोठं आव्हान बनलं होतं. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांना हुलकावणी देत असलेले हे दहशतवादी अखेर आज सुरक्षा दलांच्या टप्प्यात आले. तसेच श्रीनगरजवळील लिडवास येथे झालेल्या चकमकीत भारताच्या जवानांनी त्यांना कंठस्नान घातले.

२२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला करून २६ पर्यटकांची हत्या केल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान, हे दहशतवादी तिथून पसार झाल्याने त्यांचा शोध घेणं हे लष्करासाठी फार मोठं आव्हान बनलं होतं. मात्र पहलगाम हल्ल्यानंतर लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांना हुलकावणी देत असलेले हे दहशतवादी अखेर आज सुरक्षा दलांच्या टप्प्यात आले. तसेच श्रीनगरजवळील लिडवास येथे झालेल्या चकमकीत भारताच्या जवानांनी त्यांना कंठस्नान घातले.
पहलगाममध्ये एकूण चार दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात सहभाग असलेल्या दोन दहशतवाद्यांसह एकूण तीन दहशतवाद्यांना जवानांनी लिडवास येथे ठार मारले. पहलगाम हल्ल्यानंतर झालेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान, चिनी उपकरणांनी पाकिस्तानचा घात केला होता. तसाच काहीसा प्रकार या दहशतवाद्यांसोबत घडल्याचं सांगण्यात येत आहे. काश्मीर खोऱ्यातील घनदाट जंगलात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा कळण्यामागे चायनिज अल्ट्रा रेडियो सिस्टिम आहे, असे सांगण्यात येत आहे.
याबाबतचा घटनाक्रम पाहिल्यास पहलगाममध्ये हल्ला केल्यानंतर फरार झालेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून मानवी गस्त आणि इलेक्ट्रॉनिक सर्व्हिलान्सच्या माध्यमातून शोध घेतला जात होता. ड्रोन, थर्मल इमेजिंग आणि गुप्तचर नेटवर्कच्या माध्यमातून दहशतवाद्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात होते. दरम्यान, घनदाट जंगलामध्ये एका चायनिज अल्ट्रा रेडियो कम्युनिकेशन सिस्टिम सक्रिय झाल्याची माहिती मिळाली.
या चायनिज अल्ट्रा रेडियो कम्युनिकेशन सिस्टिमच्या माध्यमातून लष्कर ए तोयबाचे दहशतवादी इन्क्रिप्टेड संदेशांची देवाणघेवाण करून संपर्क साधत असल्याचे सुरक्षा यंत्रणांच्या निदर्शनास आले. तसेच हे दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाचाही ठावठिकाणा लष्कराला लागता. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी लष्कराने ऑपरेशन महादेव सुरू केलं.
ड्रोन आणि इंटेलिजन्स इनपूटच्या आधारावरून दहशतवाद्यांचं वास्तव्य माऊंट महादेववर असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर २८ जुलै रोजी सुरक्षा यंत्रणांनी आज सकाळीच या दहशतवाद्यांना घेरले. तसेच सहा तास चाललेल्या चकमकीदरम्यान, तीन दहशतवाद्यांना ठार केले. या दहशतवाद्यांकडून एके-४७, ग्रेनेड, आयईडीसह अनेक हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. यातील काही हत्यारे पहलगाम दहशतवादी हल्ल्यासाठी वापरण्यात आली होती. अल्ट्रा रेडियो सिग्नलमुळे दहशकवाद्यांचा ठावठिकाणा शोधण्यात खूप मदत झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
चायनीज अल्ट्रा रेडियो कम्युनिकेशन एक हायटेक रेडियो सिस्टिम आहे. ती हाय फ्रिक्वेन्सी आणि अल्ट्रा-हाय फ्रिक्वेन्सी बँडचा वापर करते. हे तंत्रज्ञान भक्कम इन्क्रिप्शनसह संवाद साधणं शक्य बनवतं. त्यामुळे त्याला पकडता येत नाही. मात्र याच सिस्टिमने आज घनदाज जंगलात लपलेल्या दहशतवाद्यांचा घात केला.