शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

CoronaVirus Updates: 'कोरोनाला रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू जास्त उपयोगाचं नाही, तर...'; केंद्रीय आरोग्य मंत्र्याचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 10:46 AM

1 / 9
वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसचा जगभरात उद्रेक पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही तब्बल 12 कोटींच्या वर गेली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे भारतात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. याच दरम्यान चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. देशात धोका वाढला असून कोरोनाच्या आकडेवारीने रुग्णांच्या संख्येचा रेकॉर्ड मोडला आहे. रुग्णांची संख्येने एक कोटीचा टप्पा पार केला आहे. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना पुन्हा एकदा धडकी भरवणारी आकडेवारी समोर येत आहे.
2 / 9
गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत वाढ झाली असून आता चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. देशातील रुग्णसंख्येने उच्चांक गाठला आहे. शनिवारी (27 मार्च) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 24 तासांत कोरोनाचे 62,258 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 291 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 1,19,08,910 पोहोचली. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 1,61,240 वर पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत आहे.
3 / 9
महाराष्ट्रात देखील कोरोना बाधित रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत असल्याने राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी राज्यात 36 हजार 902 नव्या कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर 112 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात 17 हजार 19 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे राज्यात आतापर्यंत 23 हजार 56 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
4 / 9
राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी दिल्या. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.
5 / 9
मुख्यमंत्री म्हणाले की, मला लॉकडाऊन लावण्याची अजिबात इच्छा नाही. परंतु वाढती रुग्णसंख्या विचारात घेता, आपण ज्या आरोग्य सुविधांची मोठ्या प्रमाणात राज्यभर उभारणी केली, त्या सुविधाही कमी पडतील की काय अशी शक्यता निर्माण होताना दिसत आहे. हीच बाब लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यांनी त्यांच्या आरोग्य सुविधा, बेड्स व औषधांची उपलब्धता आणि त्यात करावयाची वाढ याकडे लक्ष केंद्रीत करावे अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
6 / 9
ब्रिटनसारख्या देशात दुसरी लाट आल्यानंतर त्यांनी दोन अडीच महिन्याच्या लॉकडाऊन नंतर आता हळूहळू पुन्हा काही गोष्टी खुल्या करण्यास सुरुवात केली आहे. हीच परिस्थिती आता आपल्याकडे निर्माण होतांना दिसत आहे. धोका टळला नाही, उलट तो अधिक वाढला आहे हे जनतेने ही लक्षात घेण्याची गरज आहे. रुग्णसंख्या झपाटयाने वाढत आहे, येत्या काळात ती आणखी किती वाढेल हे सांगता येत नाही. अशावेळी कडक उपाययोजनांचा विचार करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. ज्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे तिथे आवश्यकता असेल तर जरूर लॉकडाऊन लावा पण ते लावतांना अचानक लावू नका, लोकांना त्यासाठीची कारणे सांगून लॉकडाऊन लावा अशा सूचनाही उद्धव ठाकके यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
7 / 9
महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन तसेच जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यात या सगळ्याचा खरच कितपत फायदा आहे? याचं उत्तर केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिलं आहे. ते म्हणाले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नाईट कर्फ्यू आणि दोन दिवसाचं लॉकडाऊन जास्त उपयोगाचं नाही. त्यांचं असंही म्हणणं आहे, की लसीकरणामुळेच कोरोनाची दुसरी लाट थांबवता येऊ शकते.
8 / 9
सोशल डिस्टन्सिंगच्या माध्यमातून आपण कोरोनाचा प्रसार रोखू शकतो. मात्र, आठवड्याच्या शेवटी लावलं जाणार लॉकडाऊन तसंच नाईट कर्फ्यू याचा तितका फायदा होणार नाही. ते पुढे म्हणाले, की सरकार लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्याचा विचार करत आहे. लसीकरणासाठीची वयोमर्यादाही कमी करण्यात येत आहे, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.
9 / 9
कोवॅक्सिन आणि कोविशील्ड या दोन्ही लसी पूर्णपणे सुरक्षित आणि प्रतिरोधक आहेत. देशात वापरल्या जाणाऱ्या या दोन्ही लशींबाबत कोणतीही चिंता नाही. ते म्हणाले, की भारतात लसीकरणानंतर होणाऱ्या प्रभावाबाबत सर्व प्रकरणांची पाहणी मजबूत प्रणालीद्वारे केली जात आहे, अशी माहिती देखील हर्षवर्धन यांनी दिली आहे.
टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसUddhav Thackerayउद्धव ठाकरेCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र