एक दोन नाही, अनेकदाचे पलटीकुमार! महाराष्ट्राच्या राजकारणालाही लाजवेल असा नितीशबाबूंचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 02:01 PM2024-01-28T14:01:20+5:302024-01-28T14:09:07+5:30

Nitish Kumar Bihar Political Crisis: काहीही होऊदे, मीच मुख्यमंत्री होणार... हाच उद्देश. २००५ नंतर एकदाही निवडणूक लढविली नाही. अटलबिहारींनी त्यांना राज्यात पाठविलेले...

इंडिया आघाडीची स्थापना करण्यासाठी पुढाकार ज्या व्यक्तीने घेतला त्यानेच पलटी मारून ज्यांच्याविरोधात आघाडी स्थापन केली त्यांच्या युतीत उडी मारली आहे. हे भारतात इतर कुठे नाही परंतु बिहारमध्येच घडू शकते आणि तेही नितीशकुमारच करू शकतात. कारण ते राजकारणातील पलटी मारण्यात तीसमार-खाँ आहेत.

आज त्यांनी लालू प्रसादांच्या राजदसोबतची सत्ता सोडून भाजपासोबत पुन्हा सत्ता स्थापन केली आहे. नितीशकुमारांना आता दरवाजे बंद झाले, असे म्हणणाऱ्या भाजपाच्या अमित शाहयांनी त्यांना पुन्हा एनडीएचे दरवाजे उघडले आहेत. यात लोकसभेची राजकीय तडजोड असली तरी इंडिया आघाडीला उध्वस्त करण्याची देखील रणनिती आहे.

बरं असे काही नितीशकुमारांनी पहिल्यांदाच केलेले नाहीय. इतिहासात डोकाऊन पाहिले तर अशा घटना एक दोन नाही नऊ वेळा घडल्या आहेत. मुख्यमंत्री असतानाच नितीशकुमारांची पलटी मारण्याची ही चौथी वेळ आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये त्यांनी भाजपाची साथ सोडली होती. याला दोन वर्षे होत नाहीत तोच त्यांनी पुन्हा भाजपाला जवळ केले आहे.

राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रातही राजकारणाची खिचडीच सुरु आहे. २०१४ मध्ये शरद पवारांनी भाजपाला मुकी साथ दिली आणि तहात शिवसेना चारीमुंड्या चित झाली होती. चारही पक्ष वेगळे झाले, एकमेकांविरोधात निवडणुका लढले. पुन्हा एकत्र आले. नंतरच्या निवडणुकीनंतर तर काय वेगळीच समीकरणे उदयास आली. आता तर काय दोन पक्षांची प्रत्येकी दोन शकले उडाली आहेत आणि ती भाजपासोबत सत्तेत आहेत.

नितीश कुमार नवव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. नितीश कुमार हे सर्वाधिक काळ बिहारचे मुख्यमंत्री तर आहेतच, पण त्यांनी सर्वाधिक वेळा मुख्यमंत्रीपदाची शपथही घेतली आहे. पण एक काळ असा होता की नितीशकुमार राजकारणातून संन्यास घेणार होते.

बिहारमधील बख्तियारपूर जिल्ह्यात १ मार्च १९५१ रोजी जन्मलेल्या नितीश कुमार यांनी एनआयटी पाटणा येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. शिक्षण पूर्ण झाल्याझाल्यात त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्यांनी राजकारणात येण्याचा निर्णय घेतला होता.

1977 मध्ये बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक झाली तेव्हा नितीशकुमारही जनता दलाकडून हरनौत मतदारसंघातून उभे होते. या निवडणुकीत जनता पक्षाने 214 जागा जिंकल्या आणि 97 जागा गमावल्या. नितीशकुमार पहिली निवड़णूक हरले होते. 1980 मध्ये दुसरी निवडणुकही हरले. यामुळे त्यांनी राजकारणातून सन्यास घेण्याचा निर्णय घेतला होता.

नितीश यांनी पत्नी मंजू या सरकारी शाळेत शिक्षिका होत्या. नितीश यांनी त्यांच्याकडे 1985 च्या निवडणुकीवेळी शेवटची संधी मागितली. मित्रांनी पैसे गोळा केले, मंजू यांनी त्यांच्या सेव्हिंगचे २०००० रुपये दिले. नितीशकुमार ही निवडणूक २१ हजार मतांनी जिंकले.

यानंतर 1989 मध्ये लोकसभेवरही निवडून गेले. जदयू स्थापन करून 1999 पर्यंत ते पाचवेळा लोकसभा खासदार झाले. 2004 मध्ये ते नालंदा आणि बाढ अशा दोन जागांवर उभे राहिले, एकावर जिंकले दुसरी हरले. यानंतर नितीशकुमारांनी आजपर्यंत कधीही निवडणूक लढविलेली नाही. यानंतर सुरु झाला तो पलटीबाज मुख्यमंत्र्यांचा प्रवास.

2000 मध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या, तेव्हा एकाही पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. त्यावेळी केंद्रातील अटल सरकारमध्ये नितीशकुमार कृषीमंत्री होते. निवडणुकीनंतर, भाजपच्या पाठिंब्याने, नितीश यांनी 3 मार्च 2000 रोजी पहिल्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, बहुमत नसल्याने त्यांना सात दिवसांत राजीनामा द्यावा लागला.

२००५ मध्ये नितीशकुमार दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. तेव्हापासून ते मे 2014 ते फेब्रुवारी 2015 हा काळ सोडला तर नितीशकुमारच मुख्यमंत्री आहेत. या काळात त्यांनी जीतनराम मांझी यांनी मुख्यमंत्री केले होते. परंतु पुन्हा मांझी यांना हटवून मुख्यमंत्री झाले होते. 2006 पासून ते विधान परिषद सदस्य आहेत.

2013 मध्ये भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार बनवल्यावर नितीश यांनी चिडून एनडीएसोबतची युती तोडली. त्यांनी राजदसोबत सरकार स्थापन केले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत जेडीयूचा पराभव झाल्यानंतर नितीश यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता.

नितीश यांनी 2015 ची निवडणूक राजदसोबत लढवली आणि महाआघाडीचे सरकार स्थापन झाले. पण 2017 मध्ये तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. नितीश यांनी 26 जुलै 2017 रोजी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि युतीही तोडली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एनडीएसोबत सरकार स्थापन केले.

2022 मध्ये नितीश कुमार यांची भाजपसोबतची फूट पुन्हा सुरू झाली. हे मतभेद इतके वाढले की 9 ऑगस्ट 2022 रोजी त्यांनी भाजपची साथ सोडली. त्याला त्यांनी आत्म्याचा आवाज म्हटले. नंतर त्यांनी राजद आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केले.

जानेवारी 2024 मध्ये नितीश कुमार आणि राजदमध्ये संघर्ष सुरू झाला. अखेर नितीशकुमार महाआघाडीपासून वेगळे झाले आहेत. आज ते भाजपाच्या दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत सरकार स्थापन करणार आहेत. काहीही झाले तरी मीच मुख्यमंत्री राहणार, असा त्यांचा आजवरचा प्रवास आहे.