Narendra Modi in Rajya Sabha: नरेंद्र मोदींच्या आजच्या राज्यसभेतील भाषणातील १० महत्वाचे मुद्दे; वाचा एका क्लिकवर

By मुकेश चव्हाण | Published: February 8, 2021 02:59 PM2021-02-08T14:59:26+5:302021-02-08T15:27:52+5:30

Farmer Protest: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलक शेतकरी जमा झाल्याने लोकसभेचे वातावरण तापले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान आज राज्यसभेमध्ये संबोधन देत उत्तर दिले आहे. कोरोनाकाळ आणि शेतकरी आंदोलनादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राज्यसभेमध्ये काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच मोदींनी कोरोनाकाळात केलेल्या विरोधावरून विरोधी पक्षांना फटकारले आहे.

नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेमधील आपल्या संबोधनात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यामधील काही महत्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत.

कोरोनाचे संकट आले तेव्हा संपूर्ण जग भारतासाठी चिंतीत होते. जर भारत सावरला नाही तर जगाला संकट निर्माण होईल, असे म्हटले जात होते. तेव्हा भारताने आपल्या देशाच्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी एका अज्ञात शत्रूसोबत लढाई लढली. मात्र आज भारताने ही लढाई जिंकल्याने जग अभिमान बाळगत आहे. ही लढाई कुठले सरकार किंवा व्यक्तीने लढलेली नाही. मात्र याचं श्रेय भारताला जातं, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोनाकाळात आपण अज्ञात शत्रूविरोधात लढत होतो. हा अज्ञात शत्रू काय करू शकतो याचा कुणाला अंदाज नव्हता. कुणी कुणाची मदत करू शकत नव्हते. अशा काळात आपण कोरोनाविरोधातील लढाई लढली. मात्र अशा परिस्थितीतही काही जणांकडून विरोध होत होता. कोरोनाकाळात एका वृद्ध आईने झोपडीबाहेर दिवा पेटवला. मात्र त्याचीही खिल्ली उडवली गेली. विरोध करण्यासाठी खूप मुद्दे आहेत. विरोध झाला पाहिजे. मात्र देशाचं मनोबल तोडणारा विरोध नको. देशाच्या मनोधैर्यावर, सामर्थ्यावर आघात करणारा विरोध नको, असा टोलाही मोदींनी विरोधकांना लगावला.

काळानुसार बदलणं ही काळाची गरज आहे, जे लोक राजकीय प्रतिक्रिया देत आहेत त्यांनीही सुधारणांवर अनेकदा भाष्य केले आहे, परंतु कोणीही पुढाकार घेतला नव्हता, कधीतरी सुधारणा कराव्या लागणार आहेत, चर्चा करावी, जे काही चांगलं होईल त्याचं श्रेय तुम्ही घ्या चूक झाली तर माझ्या माथी मारा पण सर्वांनी सोबत येऊन विस्तृत चर्चा करावी असं मोदींनी विरोधकांना सांगितले.

एकदा सुधारणा करून लाभ होतोय का नाही हे पाहायला हवं, त्रुटी असेल ती दुरुस्त करूया. यामुळे बाजारपेठ आधुनिक होईल, स्पर्धा वाढेल त्याचसोबत MSPआहे, राहील आणि यापुढे राहणार आहे, त्यामुळे भ्रम पसरवू नका, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या दुसऱ्या पर्यायावर भर देणं गरजेचे आहे. शेतकऱ्यांवरील बोझा कमी व्हावा यासाठी विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी, नफा वाढविण्यासाठी आपणास आणखी काम करायचं आहे. राजकारण करुन शेतकऱ्यांना काळोखात ढकलू नये असं मोदींनी सांगितले.

संसदेत चर्चेच्या माध्यमातून अनेकांनी भाष्य केले, त्यांचा राग व्यक्त केला, माझ्यावरही टीका झाली, केवढं बोललं गेलं, मी तुमच्या कामी आलो याचा मला आनंद आहे. माझ्यावर राग काढल्यानं तुमचा केवढा राग हलका झाला असेलअसा आनंद घेत राहा, चर्चा करत राहा, मोदी आहे संधी घ्या टीका करत राहा, आनंद घ्या...याठिकाणी मनातील राग बाहेर काढल्यानंतर घरी निवांत शांततेत राहता येत असेल असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना लगावला.

फाळणी झाली सर्वात जास्त फटका पंजाबला बसला, जेव्हा दंगली झाल्या पंजाबला भोगावे लागले. जम्मू काश्मीर आणि तेथील घटनांमुळेही पंजाबला त्रास सहन करावा लागला आहे. त्यामुळे शीख बांधवांच्या डोक्यात चुकीच्या गोष्टी भरल्या जात आहेत. गुरुंची महान परंपरा शीख धर्मीयांना आहे. देशाला शीख बांधवांचा अभिमान आहे असं पंतप्रधानांनी सांगितले.

जगातील कोणत्याच देशात आव्हानं नाहीत असं होत नाही, प्रत्येक देशात आव्हान असतात, पण आपण समस्येचा भाग बनावं की समाधानाचा हे स्वत: ठरवावं लागतं, वर्तमानासाठी आणि भविष्यासाठीही काम करायचं आहे असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

शेतकरी आंदोलनावर बोलताना मोदींनी माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचेही आभार मानले. त्यांनी चर्चेला गंभीर रूप दिले. त्यांनी सरकारच्या प्रयत्नांचे कौतुकही केले. तसेच त्यांनी या विषयावर काही सूचनाही दिल्या. ते शेतकरी प्रश्नांशी जोडलेले आहेत. त्यामुळे शेतीची मूलभूत समस्या काय? याची मुळं शोधली जायला हवीत, असं मोदींनी सांगितलं.