Aryan Khan: आर्यन खान प्रकरणात नवा ट्विस्ट; सुनील पाटील नवाब मलिकांचा माणूस, नीरज यादवचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 02:50 PM2021-11-08T14:50:52+5:302021-11-08T14:55:17+5:30

Nawab Malik on Mumbai Cruise Drugs Case: मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टीबाबत रोज वेगवेगळी नावं पुढे येत आहे. सुनील पाटीलने नीरज यादवचं नाव घेतल्यानंतर आता त्याने समोर येऊन सुनील पाटीलवरच आरोप केला आहे.

मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. सुरुवातीला किरण गोसावी, मनीष भानुशाली यांचे नाव उघड झाले त्यानंतर प्रभाकर साईल, विजय पगारे, सुनील पाटील आणि आता नीरज यादव यांनी समोर येऊन माध्यमांसमोर खुलासा केला आहे.

क्रुझ ड्रग्स पार्टीबाबत टीप देणाऱ्या नीरज यादवनं सुनील पाटील हा नवाब मलिकांचा माणूस असल्याचा दावा केला आहे. तसेच समीर वानखेडे यांचं नावही कधी ऐकलं नव्हतं. माझी त्यांची ओळख नाही असं नीरज यादवनं म्हटलं आहे. सुनील पाटीलने या प्रकरणात नीरज यादवचं नाव घेतल्यानंतर तो समोर आला आहे.

नीरज यादव म्हणाला की, सुनील पाटील याच्यासोबत माझे काहीही संबंध नाहीत. सुनील पाटील याला पहिल्यांदा उज्जैन इथं मनीष भानुशालीसोबत आलेला असताना पाहिलं होतं. माझं सुनील पाटीलसोबत कधी बोलणं झालं नाही. केवळ २ ऑक्टोबरला त्याचा कॉल आला होता.

सकाळी ११.३० च्या सुमारास सुनील पाटीलने मला व्हॉट्सअप कॉल केला होता. त्यामुळे तो रेकॉर्ड होऊ शकला नाही. त्यावेळी त्याने बघितली का माझी पॉवर असं विधान केले होते. क्रुझ ड्रग्स पार्टीबाबत NCB ला माहिती देण्याचं काम सुनील पाटीलनेच केले असा दावा नीरज यादवने केला आहे.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नीरज यादवचे भाजपाशी संबंध असल्याचा दावा केला होता. त्यावर यादव म्हणाला की, माझे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत. उद्या ते माझे मोदींशी संबंध आहेत बोलतील. मी सामान्य भाजपा कार्यकर्ता आहे. भाजपासाठी काम करतो असं नीरजने स्पष्ट सांगितले.

त्याचसोबत मला जी माहिती मिळाली ती चुकीची नव्हती ना? नशामुक्त भारत आपल्याला बनवायचा असेल तर त्यात चुकीचं काय आहे? माझी माहिती खरी ठरली. क्रुझवर ड्रग्सही सापडलं. या पार्टीत आर्यन खान येणार हे माहिती नव्हतं. माझ्याकडे केवळ दिल्लीच्या लोकांची माहिती होती असं नीरजने सांगितले.

सुनील पाटील हा महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांचा माणूस आहे. या संपूर्ण प्रकरणावर राजकारण केले जात आहे. नवाब मलिकांच्या इशाऱ्यावरच सुनील पाटील काम करतो. जेव्हा हे प्रकरण समोर आलं तेव्हा मी समीर वानखेडेंचे नाव ऐकलं. त्यापूर्वी समीर वानखेडेंचे नावही ऐकलं नव्हतं असंही नीरजने स्पष्ट केले.

काय म्हणाला होता सुनील पाटील? – माझ्याकडे ड्रग्स प्रकरणाची जी लिस्ट आली ती नीरज यादवने दिली होती. नीरज यादव हे मध्य प्रदेशातील भाजपा नेत्यांच्या जवळचे आहेत. या लिस्टमध्ये आर्यन खानचं नाव नव्हतं. मी केवळ सॅम डिसुझा आणि किरण गोसावी, मनीष भानुशाली यांची ओळख करुन दिली एवढाच माझा या प्रकरणात सहभाग आहे.

त्याचसोबत माझ्या जीवाला धोका आहे. दिल्लीत मला मारण्याचा प्रयत्न झाला. मनीष भानुशाली, धवल भानुशाली यांनी मला दिल्लीत बोलावलं होतं. तुला भाजपा नेत्यांशी भेट घालून देतो तुला सुरक्षित ठेऊ असं मला सांगण्यात आलं होतं. परंतु मला मारण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मी कसाबसा मुंबईत आलो असं सुनील पाटील म्हणाला.

तसेच १९९९ पासून मी राष्ट्रवादी काँग्रेससोबत होतो. २०१६ पर्यंत मी सक्रीय होतो. त्यानंतर कुठल्याही पक्षात सक्रीय नाही. ऋषी देशमुख याला ओळखत नाही. नवाब मलिकांसोबत मी १० ऑक्टोबरला पहिल्यांदाच बोललो. याआधी कधीही मलिकांना भेटलो नव्हतो. मोहित कंबोज यांनी CCTV समोर आणावेत असंही सुनील पाटील म्हणाला होता.

Read in English