Covaxin : भारत बायोटेकनं WHO मध्ये जमा केली ९० टक्के कागदपत्रे; EUL साठी मागितली होती अधिक माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 10:46 AM2021-05-25T10:46:43+5:302021-05-25T10:57:28+5:30

Covaxin Emergeny Use List: भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडनं सरकारला दिलेल्या माहितीनुसार कोव्हॅक्सिनशी निगडीत ९० टक्के कागदपत्रे WHO मध्ये केली जमा.

Covaxin Emergeny Use List: कोव्हॅक्सिन लसीशी निगजीत ९० टक्के कागदपत्रे जागतिक आरोग्य संघटनेकडे (WHO) मध्ये जमा केल्याची माहिती सरकाला दिली असल्याचं भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेडनं सांगितलं.

लसीच्या आपात्कालिन वापरासाठी लिस्ट (EUL) केलं जावं यासाठी भारत बायोटेकनं ही कागदपत्रे जमा केली आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनं या यादीत सामील करण्यासाठी भारत बायोटेककडून अधिक कागदपत्रांची मागणी केली आहे.

उर्वरित १० टक्के कागदपत्रे जून महिन्यात जमा करण्यात येणार असल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं. भारत बायोटेकनं १९ एप्रिल रोजी संघटनेसमोर 'एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट' दाखल केला होता.

सध्या या यादीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाची कोविशिल्ड (Covishield), मॉडर्ना (Moderna), फायझर (Pfizer), अॅस्ट्राझेनका २ (Astrazeneca) आणि सिनोफार्म/बीबीआयपीच्या नावाचा समावेश आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार WHO च्या EUL मध्ये सामील नसल्यामुळे कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांना परदेशात जाण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागत आहे. काही देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवशांसाठी धोरणं तयार केली आहेत.

देशांनी तयार केलेल्या धोरणांनुसार त्याच लसींना मंजुरी देण्यात आली आहे, ज्या लसींना नियामक मंडळांकडून मंजुरी मिळाली आहे किंवा त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या यादीत सामील असतील.

डब्ल्यूएचओने म्हटले आहे की भारत बायोटेकला कोव्हॅक्सिन लसीच्या आपात्कालिन लसींच्या यादीत सामील करण्यासाठी अधिक माहिती द्यावी लागणार आहे.

वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, जर मूल्यमापनासाठी सादर केलेलं उत्पादन यादीमध्ये समाविष्ट करण्याच्या निकषांवर पूर्ण झाले तर डब्ल्यूएचओ त्याचे निकाल मोठ्या प्रमाणात प्रकाशित करेल.

EUL प्रक्रियेचा कालावधी लस उत्पादकाद्वारे सबमिट केलेल्या डेटाच्या गुणवत्तेवर आणि डब्ल्यूएचओच्या निकषांना पूर्ण करणाऱ्या डेटावर अवलंबून असतो.

वृत्तानुसार, यानंतर कंपनीला एक डॉजियर दाखल करावा लागेल. या डोजिअरच्या स्वीकृतीनंतर कोव्हॅक्सिनच्या यादीमध्ये समाविष्ट होण्यापूर्वी डब्ल्यूएचओकडून एक मूल्यांकन केले जाईल. यानंतर, ही लस EU मध्ये समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. आता या काळात प्रत्येक टप्प्यावर आठवड्यांचा कालावधी लागू शकतो.

जागतिक आरोग्य संघटनेकडून तातडीच्या वापराची परवानगी मिळेल असा आत्मविश्वास कंपनीला आहे. कोव्हॅक्सिनला ११ देशांतून नियामक मान्यता आणि सात देशांतून तंत्रज्ञान हस्तांतर आणि उत्पादनासाठी ११ कंपन्यांचा इंटरेस्ट मिळाला आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यावर भर दिला जात आहे. यासाठी भारत बायोटेक बूस्टर डोसची चाचणी सुरू करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भारत बायोटेक आयसीएमआर आणि एनआयव्हीच्या सहकार्यानं कोवॅक्सिनच्या बूस्टर डोसची चाचणी घेणार आहे. कोवॅक्सिनच्या तिसऱ्या डोसच्या चाचणीला लवकरच सुरुवात होईल.

या चाचणी दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील चाचणीत सहभागी झालेल्या काही स्वयंसेवकांना बूस्टर डोस देण्यात येईल. कोरोना प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी हा डोस रोगप्रतिकारशक्ती किती वाढवतो, याची चाचपणी भारत बायोटेककडून करण्यात येणार आहे. आतापर्यंतच्या चाचणीत बूस्टर डोस ८१ टक्के प्रभावी ठरला आहे.

कोव्हॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीचे निष्कर्ष मार्चमध्ये समोर आले. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांमध्ये लस ८१ टक्के प्रभावी ठरली. भारत बायोटेकनं देशभरात २५ हजार ८०० जणांवर याची चाचणी घेतली होती. आयसीएमआरच्या सहकार्यानं पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात चाचणी घेण्यात आली.