ओडिशातील झारसुगुडा रेल्वे स्थानकावर भीषण आग, स्टेशन मास्टरचे चेंबर जळून खाक, पाहा फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 14:19 IST
1 / 5ओडिशातील महत्त्वाच्या झारसुगुडा रेल्वे स्थानकावर मंगळवारी सकाळी भीषण आगीची घटना घडली. सकाळी ११:३० च्या सुमारास स्टेशन मास्टरच्या चेंबरमध्ये अचानक लागलेल्या आगीमुळे संपूर्ण स्थानक परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे.2 / 5मिळालेल्या माहितीनुसार, स्टेशन मास्टरच्या चेंबरमधून अचानक काळ्या धुराचे लोट बाहेर येऊ लागले. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. धुराचे लोट इतके मोठे होते की ते अनेक मीटर अंतरावरून स्पष्टपणे दिसत होते. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि सर्वांनी सुरक्षित स्थळी धाव घेतली.3 / 5आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दोन गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. रेल्वे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे आग स्थानकाच्या इतर भागात पसरण्यापासून रोखण्यात यश आले.4 / 5ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट किंवा तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे. रेल्वे प्रशासनाने या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.5 / 5घटनेनंतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. स्थानक परिसरातील परिस्थिती आता नियंत्रणात असून रेल्वे वाहतुकीवर याचा काय परिणाम झाला आहे, याचा तपास घेतला जात आहे. स्टेशन मास्टरच्या चेंबरमधील कागदपत्रे आणि साहित्याचे मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.