अजबच! येथे चक्क डम्पिंग ग्राऊंड बनलंय पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र, फोटोशूटसाठी होतेय गर्दी, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 16:04 IST2026-02-27T15:58:33+5:302026-02-27T16:04:00+5:30
Kishangarh Dumping Yard: राजस्थानमध्ये असं एक ठिकाण आहे जिथे अनेक पर्यटक हे केवळ तिथे डम्पिंग ग्राऊंडवर असलेला कचरा पाहण्यासाठी येतात. येथे लोक फोटोशूट करतात एवढंच काय तर येथे प्री वेडिंग, वेडिंग फोटोशूटसुद्धा केले जातात. आता डम्पिंग ग्राऊंडवर फोटोशूट करण्यासारखं एवढं खास काय आहे हे आपण जाणून घेऊयात.

राजस्थान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते मोठं वाळवंट, पुरातन किल्ले आणि राजपूत राजांचे राजवाडे. या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी लाखो पर्यटक राजस्थानला भेट देतात. मात्र याच राजस्थानमध्ये असं एक ठिकाण आहे जिथे अनेक पर्यटक हे केवळ तिथे डम्पिंग ग्राऊंडवर असलेला कचरा पाहण्यासाठी येतात. येथे लोक फोटोशूट करतात एवढंच काय तर येथे प्री वेडिंग, वेडिंग फोटोशूटसुद्धा केले जातात. आता डम्पिंग ग्राऊंडवर फोटोशूट करण्यासारखं एवढं खास काय आहे हे आपण जाणून घेऊयात.

तर या ठिकाणाचं आहे किशनगड. किशनगड हे राजस्थानची राजधानी असलेल्या जयपूरपासून सुमारे १०० किमी अंतरावर आहे. तसेच येथे असलेलं डम्पिंग ग्राऊंड हे सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र ठरलेलं आहे. किशनगड हे आशिया खंडातील सर्वात मोठं संगमरवरचं मार्केट आहे. तसेच या मार्केटमधील कचरा जिथे जातो त्याला किशनगड डंपिंग यार्ड म्हणतात. हा डम्पिंग यार्ड पाहण्यासाठी राजस्थान आणि राजस्थान बाहेरूनही लोक येतात.

या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे येथे मार्बलची धूळ जमा होते आणि ती बर्फाच्या डोंगरांसारखी दिसते. सगळीकडे पांढरे पर्वत, जमीन आणि मध्ये निळं पाणी असं नयनरम्य दृष्य येथे दिसतं. हे सुंदर दृष्य पाहण्यासाठी पर्यटक येथे येतात.

सुमारे ३१ मैलामध्ये पसरलेल्या जागेवर किशनगडमधील १२०० संगमरवर कापणाऱ्या कारखाऱ्यामधील कचरा, टाकाऊ भाग आणून टाकला जातो. सूर्यप्रकाशामुळे यातील पाण्याचं बाष्पिभवन होऊन हा भाग सुकतो आणि उरलेला भाग पांढऱ्या दगडासारखा दिसतो.

आता या ठिकाणी प्री वेडिंग फोटोशूटची क्रेझ खूप वाढली आहे. तसेच मोठ्या संख्येने लोक येथे फोटोशूट आणि रिल्स चित्रित करण्यासाठी येतात. सोशल मीडियावर हे ठिकाण भारतामधील स्वित्झर्लंड म्हणून प्रसिद्ध झाली आहे. तसेच या जागेवरचे रिल्ससुद्धा खूप प्रसिद्ध होत आहेत.

मात्र किशनगडमध्ये टाकणात येणाऱ्या संगमरवरच्या कचऱ्यामुळे पर्यावरणाला नुकसान होण्याची भीतीही अनेक रिपोर्टमधून व्यक्त करण्यात आली आहे. या कचऱ्यामध्ये सुक्ष्म धुलिकण असतात. तसेच ते ब्राँकायटिससारख्या श्वसनाच्या आजाराला कारणीभूत ठरू शकतो. तसेच हा कचरा येथील मातीचं अस्तित्व संपुष्टात आणत असून, त्याता भूगर्भातील पाण्यावरही परिणाम होत आहे. मात्र सध्यातरी हा संगमरवराचा कचरा पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरलेला आहे.

















