Joshimath Landslide And Prediction: ‘ती’ भविष्यवाणी खरी होणार? घरांना तडे, जमीन खचतेय, दरड कोसळतेय; जोशीमठमधील परिस्थिती गंभीर!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2023 01:53 PM2023-01-09T13:53:38+5:302023-01-09T14:00:30+5:30

Joshimath Importance And Prediction: जोशीमठाचे महात्म्य विशेष आहे. धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या हे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. जोशीमठाबाबत काय भाकित करण्यात आले आहे? जाणून घ्या...

उत्तराखंडमधील जोशीमठ येथील परिस्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर आणि बिकट होत चालली आहे. उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी या भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. तसेच पंतप्रधान कार्यालयाने याची दखल घेत एक उच्चस्तरीय बैठक घेण्यात येत आहे. जोशीमठ येथील शेकडो घरांना तडे गेले आहे. शेकडो कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले आहे. या परिस्थितीत स्थानिक भयभीत झाले आहेत. (Joshimath Landslide Sinking News)

जोशीमठच्या स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की, एनटीपीसीच्या तपोवन विष्णुगड जलविद्युत प्रकल्पाचा बोगद्याच्या कामामुळे या भागातील घरांना तडे जाणे, जमीन खचणे, दरड कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत.या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आता जोशीमठमध्ये कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना बंदी घालण्यात आली आहे. (Joshimath Landslide And Prediction)

जोशीमठ हे उत्तराखंडचे एक पवित्र धार्मिक ठिकाण देखील आहे जे समुद्रसपाटीपासून २५०० ते ३०५० मीटर उंचीवर आहे. मात्र, जोशीमठ येथील या परिस्थितीमुळे देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत जोशीमठ आणि बद्रीनाथ यांच्याबाबत वर्तवलेले भाकीत खरे होणार का? आगामी काळात भाविकांना बद्रीनाथचे दर्शन घेता येणार नाही का? जोशीमठाबाबत कलियुगात काय भविष्यवाणी करण्यात आली आहे? ते जाणून घेऊया... (Joshimath Importance And Prediction)

जोशीमठचे प्राचीन नाव कार्तिकेयपूर होते. त्यावेळी जोशीमठ ही कात्युरी राजांची राजधानी होती. जेव्हा आदि शंकराचार्य चार धामांच्या स्थापनेसाठी दौरे करत होते, त्या वेळी त्यांनी जोशीमठातील तुतीच्या झाडाखाली तप केले आणि येथे ज्योतिषाचे ज्ञान प्राप्त केले. म्हणूनच जोशीमठला ज्योतिर्मठ आणि ज्योतिषपीठ म्हणूनही ओळखले जाते.

शंकराचार्यांनीही येथे भगवान नृसिंह यांची मूर्ती स्थापन केली होती. कारण जोशीमठ हे भगवान नृसिंह यांचे तपस्थानही मानले जाते. पूर्वी जोशीमठ समुद्रात वसले होते अशी आख्यायिका आहे. जेव्हा ते पर्वताच्या रूपात उभे राहिले, तेव्हा भगवान नृसिंहांनी ते आपले तप केले.

रामायण काळात हनुमंतांचे येथे आगमन झाले होते, अशी आख्यायिका जोशीमठाबाबत आहे. जेव्हा लक्ष्मण मेघनादाच्या शक्तीबाणाने बेशुद्ध झाले होते, तेव्हा संजीवनी आणण्यासाठी हनुमंत येथे आले होते. हनुमंतांना रोखण्यासाठी रावणाने कालनेमी नावाच्या राक्षसाला पाठवले.

जोशीमठ भागातच हनुमानाने कालनेमीचा वध केला. कालनेमीला हनुमानजींनी मारलेली भूमी आजही लाल मातीसारखी दिसते. महाभारत काळात हनुमंतांनी याच भागात पांडवांना दर्शन दिले होते. अज्ञानाच्या काळात स्वर्गाच्या प्रवासादरम्यान पांडव जोशीमठात आले होते, अशीही एक मान्यता आहे. या घटनेची आठवण म्हणून आजही लोक कापणीनंतर पांडव नृत्य करतात.

जोशीमठ येथील नृसिंह मंदिर हे भगवान बद्रीनाथांचे शीतकालीन स्थान आहे. येथील मंदिरात नृसिंह देवाची प्राचीन मूर्ती आहे. भगवान नृसिंह यांच्या मूर्तीबाबत अनेक समजुती आहेत. वास्तविक भगवान नृसिंह यांचा एक हात सामान्य आहे, तर दुसरा हात अतिशय पातळ आहे. आणि गेल्या अनेक वर्षांपासून तो हात आणखीन पातळ होत चालला आहे. असे मानले जाते की, ज्या दिवशी भगवान नृसिंह यांचा हात निखळेल, त्या दिवशी बद्रीनाथचा मार्ग बंद होईल.

नर नारायण पर्वत एक होईल. भगवान बद्रीनाथ सध्या ज्या मंदिरात भक्तांना दर्शन देत आहेत त्या मंदिरात भगवान बद्रीनाथचे भक्तांना दर्शन होणार नाही. कारण नर-नारायण पर्वताच्या एकच झाल्यामुळे बद्रीनाथ धाम नाहीसा होईल, अशी लोकमान्यता आहे. यानंतर भाविकांना भविष्य बद्रीत भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेता येणार आहे, असे सांगितले जात आहे.

नर नारायण पर्वत एकच होतील, तेव्हा जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता बंद होईल. तेव्हा भगवान बद्रीनाथ भाविकांना भविष्य बद्री येथे दर्शन देतील, अशी मान्यता आहे. येथे एक खडक आहे ज्यावर एक अस्पष्ट आकृती आहे. असे म्हणतात की, देवाची ही आकृती हळूहळू पूर्णत्वास येत आहे. ज्या दिवशी हा आकार पूर्णपणे प्रकट होईल, त्या दिवसापासून भगवान बद्रीनाथ हे भाविकांना भविष्य बद्रीतच दर्शन देतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित आहे.

दरम्यान, १९७५ मध्ये आयुक्त मुकेश मिश्रा यांनी एक आयोग स्थापन केला. याला मिश्रा आयोग म्हणत. यामध्ये भूवैज्ञानिक, अभियंते, प्रशासनातील अनेक अधिकारी सामील होते. एक वर्षानंतर आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला. या अहवालात जोशीमठ हे वालुकामय खडकावर वसलेले असल्याचे म्हटले होते.

मिश्रा आयोगाच्या १९७६ च्या अहवालात जोशीमठच्या मुळाशी छेडछाड केल्यास जोशीमठला धोका निर्माण होईल, असे म्हटले होते. या आयोगातर्फे जोशीमठचे सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये जोशीमठ हे मोराइन (हिमनगासोबत येणारी माती) वसलेले असल्याचे सांगण्यात आले, जे अत्यंत संवेदनशील मानले जात होते.

मिश्रा आयोगाच्या अहवालात जोशीमठच्या मुळाशी जोडलेल्या खडक आणि दगडांना अजिबात धक्का लागता कामा नये, असे सांगण्यात आले. त्याचबरोबर येथे होत असलेले बांधकाम मर्यादित कार्यक्षेत्रात करण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र, आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

जोशीमठच्या पायथ्याशी कोणतेही मोठे काम करता येत नाही. स्फोट, खाणकाम या सर्व बाबींचा उल्लेख या अहवालात करण्यात आला होता. मोठे बांधकाम किंवा खाणकाम करू नये तसेच अलकनंदा नदीच्या काठावर सुरक्षा भिंत बांधावी, येथून वाहणाऱ्या नाल्यांचे संरक्षण करावे, असे सांगण्यात आले, मात्र या अहवालाकडे सरकारने दुर्लक्ष केले, असे सांगितले जात आहे.

जोशीमठमधील परासारी, रविग्राम, सुनील, वरचा बाजार, नरसिंग मंदिर, मनोहर बाग, सिंहधर, मारवाडी आणि गांधी नगर – या भागात सुमारे ६०३ घरांमध्ये केवळ तडे गेलेले नाहीत, तर या भेगा रुंदावत आहेत. अनेक ठिकाणी जमीन खचली असून अनेक ठिकाणी भिंतींमधून अचानक पाणी येत आहे.