अंतराळात पेट्रोलपंप...! कधी स्वप्नातही विचार केलाय का? इस्रोचे रॉकेट थोड्याच वेळात झेपावणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 10:00 IST2026-01-12T09:53:10+5:302026-01-12T10:00:19+5:30
ISRO PSLV-C62 Launch Marathi : इस्रोने अवकाशात भारताचा पहिला 'रिफ्युलिंग' उपग्रह AayuSat लाँच होणार आहे. यामुळे उपग्रहांचे आयुष्य वाढवणे शक्य होईल. वाचा सविस्तर बातमी.

श्रीहरिकोटा: भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो आज, १२ जानेवारी २०२६ रोजी आपल्या पहिल्या मोहिमेद्वारे नवा विक्रम प्रस्थापित करण्यासाठी सज्ज झाली आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून सकाळी १०:१७ वाजता PSLV-C62 या रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

ही मोहीम केवळ उपग्रह सोडण्यासाठी नाही, तर अंतराळात 'इंधन भरण्याची' भारताची पहिली चाचणी असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष याकडे लागले आहे.

काय आहे 'अंतराळातील पेट्रोल पंप'?
या मोहिमेचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे चेन्नईतील 'ऑर्बिटएड एयरोस्पेस' या स्टार्टअप कंपनीने तयार केलेला 'आयुसॅट' उपग्रह. सध्या अंतराळात उपग्रहातील इंधन संपले की तो निकामी होतो आणि कचरा म्हणून फिरत राहतो. मात्र, आयुसॅट ही समस्या सोडवणार आहे.

तंत्रज्ञान: हा उपग्रह 'ऑन-ऑर्बिट रिफ्युलिंग' तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक करेल. यासाठी यात विशेष 'डॉकिंग आणि रिफ्युलिंग पोर्ट' बसवण्यात आले आहेत.

फायदा: यामुळे भविष्यात निकामी होणाऱ्या उपग्रहात पुन्हा इंधन भरून त्यांचे आयुष्य वाढवता येईल, ज्यामुळे अब्जावधी रुपयांची बचत होईल.

जागतिक स्थान: ही चाचणी यशस्वी झाल्यास, अंतराळात इंधन भरण्याचे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत हा जगातील मोजक्या देशांपैकी एक ठरेल.

मोहिमेचा सविस्तर तपशील
PSLV-C62 हे इस्रोचे ६४ वे उड्डाण आहे. या रॉकेटने मुख्य उपग्रह EOS-N1 (अन्वेषा) याच्यासह एकूण १६ उपग्रह अवकाशात नेले जात आहेत.

प्रक्षेपणाच्या साधारण १७ मिनिटांनंतर मुख्य उपग्रह त्याच्या कक्षेत सोडला गेला, तर संपूर्ण मोहीम १०८ मिनिटांत पूर्ण होणार आहे.

ऑर्बिटएडचे संस्थापक शक्ती कुमार रामचंद्रन यांच्या मते, "आयुसॅट केवळ एक मिशन नसून, अंतराळातील शाश्वत अर्थव्यवस्थेचा पाया आहे." यामुळे भविष्यात अंतराळात 'सर्व्हिसिंग स्टेशन्स' उभारणे शक्य होणार आहे.

















