मातृ देवो भव:; नौदल प्रमुखपदाची सूत्रं स्वीकारल्यानंतर ॲडमिरल आर. हरी कुमार आईपुढे नतमस्तक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 03:30 PM2021-11-30T15:30:30+5:302021-11-30T15:53:33+5:30

ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी आज भारताचे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला.

नवी दिल्ली: व्हॉईस ॲडमिरल आर. हरी कुमार यांनी आज(मंगळवार) भारताचे नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. ॲडमिरल आर. हरी कुमार भारताचे 25वे नौदल प्रमुख झाले आहेत.

पदभार स्वीकारल्यानंतर हरी कुमार यांनी आपल्या आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतले आणि त्यांना मिठी मारली. न्यूज एजन्सी एएनआयने या खास क्षणाचे फोटो आणि एक व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये नवे नौदल प्रमुख त्यांच्या आईकडून आशीर्वाद घेत आहेत.

आज म्हणजेच 30 नोव्हेंबर रोजी ॲडमिरल करमबीर सिंग निवृत्त होत आहेत. त्यांच्यानंतर आता हरी कुमार हे भारताचे नवे नौदल प्रमुख असतील. कार्यक्रमादरम्यान, अ‍ॅडमिरल आर हरिकुमार यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन नौदल प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले.

आर हरी कुमार यांचा जन्म 12 एप्रिल 1962 रोजी झाला होता. 1 जानेवारी 1983 रोजी हरी कुमार यांची नौदलाच्या कार्यकारी शाखेत नियुक्ती झाली. त्यांनी नेव्हल वॉर कॉलेज, यूएस, आर्मी वॉर कॉलेज, महू आणि रॉयल कॉलेज ऑफ डिफेन्स स्टडीज, यूके येथून शिक्षण घेतले आहे.

सुमारे 39 वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेत त्यांनी कर्मचारी, कमांड आणि इतर अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले. या प्रदीर्घ सेवेनंतर आज अखेर त्यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.

अ‍ॅडमिरल हरी कुमार यांनी त्यांच्या कारकिर्दीत विविध पदांवर काम केले आहे. हरी कुमार यांच्या 'सी कमांड'मध्ये आयएनएस निशंक, मिसाइल कॉर्व्हेट, आयएनएस कोरा आणि गाइडेड मिसाइल डिस्ट्रॉयर आयएनएस रणवीर यांचा समावेश आहे.

ॲडमिरल हरी कुमार यांनी भारतीय नौदलाच्या विमानवाहू युद्धनौका INS विराटचेही नेतृत्व केले आहे. नौदलाचा उजवा हात म्हणून ओळखल्या जाणार्‍या मुंबईस्थित डब्ल्यूएनसीची सूत्रे कुमार यांनी यावर्षी फेब्रुवारीमध्ये हाती घेतली होती. त्यानंतर आता आज त्यांची नौदल प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे.