दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2025 19:32 IST2025-10-19T19:27:22+5:302025-10-19T19:32:19+5:30

आता पाकिस्तानी दहशतवाद्यांना भारतात घुसणं महागात पडणार आहे. भारतीय सैन्याने नियंत्रण रेषेवर (LOC) देखरेख आणि रसद वाढविण्यासाठी रोबोटिक खेचर म्हणजेच मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट (MULE) वापरण्यास सुरुवात केली आहे.

या खेचरच्या एका सिग्नलने सैन्य काही सेकंदात पाकिस्तानी शत्रूचा खात्मा करू शकते. भारतीय सैन्य वापरत असलेले रोबोटिक खेचर हे सैन्याने सुरू केलेल्या अनेक नवीन संकल्पनांपैकी एक आहे असं एका लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

आम्ही पुढील पिढीतील शस्त्रे आणि उपकरणे वापरत आहोत. हे रोबोटिक खेचर गस्त घालण्यासाठी तैनात आहेत. त्यांच्यावरील कॅमेरे आम्हाला धोक्यांची आगाऊ सूचना देत सतर्क करू शकतात. हे रोबोटिक खेचर सेन्सर आणि कॅमेऱ्यांनी सुसज्ज आहेत. आम्ही ऑपरेशन सिंदूर दरम्यान देखील त्यांचा वापर केला असं लष्कराने सांगितले.

आर्क व्हेंचर्स (ARCV) ची नवी दिल्लीस्थित उपकंपनी असलेल्या AeroArk द्वारे विकसित केलेले आहे. ARCV Mule हे सीमा सुरक्षा, मालमत्ता संरक्षण, धोकादायक पदार्थांचे नियंत्रण (CBRNE), बॉम्ब निकामी करणे आणि गुप्तचर माहिती गोळा करणे यासह विविध कामांसाठी डिझाइन केलेले आहे. रोबोटिक खेचर, ज्याला मल्टी-युटिलिटी लेग्ड इक्विपमेंट (MULE) असेही म्हणतात, ते रिमोटली नियंत्रित किंवा स्वायत्तपणे चालवता येते.

त्यात एक संगणक, बॅटरी, पुढचे आणि मागचे सेन्सर्स आणि हालचाल करण्यासाठी पाय आहेत. भारतीय सैन्याला जून २०२४ मध्ये असे १०० रोबोटिक खेचर मिळाले असल्याची माहिती आहे.

हे सर्व प्रदेशात चालणारे रोबोट विविध वातावरणात सैनिकांची कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुधारण्यासाठी आहेत. ते पायऱ्या, उंच उतार आणि कचऱ्याने भरलेल्या भागात नेव्हिगेट करू शकतात.

प्रजासत्ताक दिनापूर्वी झालेल्या आर्मी डे परेडमध्ये रोबोटिक खेचर दिसले होते. ते गेल्या वर्षीच सैन्यात सामील झाले होते. त्यांची परेड पाहण्यासारखी होती कारण या रोबोटिक खेचरांनी प्रमुख पाहुण्यांनाही सलामी दिली.

या रोबोटिक खेचरांमध्ये थर्मल कॅमेरे आणि इतर सेन्सर्स आहेत, ज्यामुळे ते पाळत ठेवू शकतात. त्यांना लहान शस्त्रे देखील सुसज्ज करता येतात आणि आवश्यक असल्यास मानवी जीव धोक्यात न घालता शत्रूवर हल्ला करता येतो.

भारतीय लष्कर आता सीमेवर माल वाहून नेण्यासाठी खेचरांचा वापर कमी करत असून त्याऐवजी सीमेवर फ्रंटलाईन लढणाऱ्या सैनिकांपर्यंत लहान साहित्य वाहून नेण्यासाठी देखील रोबोटिक खेचरचा वापर केला जाऊ शकतो.

हे रोबोटिक खेचर कोणत्याही भूप्रदेशावर, वर आणि खाली, नेव्हिगेट करू शकतात आणि ७० ते ८० किलोग्रॅम वजन वाहून नेऊ शकतात. मोठ्या रोबोटमध्ये जास्त क्षमता असेल.