CoronaVirus News: भारताचा खास मित्र मदतीची परतफेड करायला येतोय; आता अवघ्या ३० सेकंदांत कोरोना टेस्टचा रिझल्ट येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 07:34 PM2020-07-23T19:34:33+5:302020-07-23T19:40:37+5:30

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा अतिशय झपाट्यानं वाढत आहे. गेले काही दिवस दररोज ३५ ते ४० कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यात काल विक्रमी वाढ झाली.

काल दिवसभरात कोरोनाचे ४५ हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले. तर मृतांचा आकडा ३० हजारांच्या पुढे गेला आहे. त्यामुळे सगळ्यांचीच चिंता वाढली.

भारतामधील कोरोनाचं संकट दिवसागणिक अधिक गहिरं होत आहे. या परिस्थितीत आता इस्रायल भारताच्या मदतीला धावणार आहे.

कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताच्या मदतीला अधिकारी आणि तज्ज्ञांचं पथक येणार असल्याची माहिती इस्रायलच्या भारतातील दूतावासाकडून देण्यात आली आहे.

भारतातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. ही बाब लक्षात घेता भारत आणि इस्रायलचे संशोधक मिळून अवघ्या ३० सेकंदांत कोरोना चाचणीचा अहवाल देणाऱ्या तंत्रज्ञानावर काम करणार असल्याची माहितीदेखील दूतावासाकडून देण्यात आली आहे.

येत्या काही आठवड्यांत इस्रायलचं परराष्ट्र व्यवहार, संरक्षण आणि आरोग्य मंत्रालय भारतासोबत कोरोनाविरोधात अभूतपूर्व लढा सुरू करेल. इस्रायल भारताला संपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही इस्रायली दूतावासाकडून देण्यात आली.

इस्रायलच्या तेल अविवमधून लवकरच संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी, संशोधन आणि विकास विभागातील संशोधकांच्या पथकाला घेऊन एक विशेष विमान दिल्लीसाठी झेपावणार असल्याची माहिती दूतावासानं दिली.

भारतातील प्रमुख शास्त्रज्ञ के. विजय राघवन आणि डीआरडीओसोबत अतिशय वेगवान कोरोना चाचणी करणारं उपकरण इस्रायल तयार करेल. या माध्यमातून अवघ्या ३० सेकंदांमध्ये कोरोना चाचणीचा अहवाल मिळू शकेल.

इस्रायलमध्ये कोरोनाचा कहर सुरू असताना भारतानं आम्हाला मोलाची मदत केली. आता भारत संकटात आहे. त्यामुळे आम्ही मदतीची परतफेड करू, असं इस्रायलच्या दूतावासानं म्हटलं.

'इस्रायल संकटात असताना भारतानं तातडीनं वैद्यकीय मदत पाठवली. औषधं, मास्क आणि इतर सुरक्षा साधनांचा पुरवठा केला. भारतानं केलेली मदत अतिशय मोलाची ठरली. आता आम्ही आमच्या मित्राला मदत करू,' अशा शब्दांत इस्रायलनं मदतीची ग्वाही दिली आहे.

Read in English