पाकिस्तान डोळे विस्फारून पाहत राहिला अन् भारतानं जर्मनीसोबत केली मोठी डील, शरीफ यांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 11:59 IST2026-01-30T11:45:18+5:302026-01-30T11:59:03+5:30

भारत आणि जर्मनी यांच्यात नव्या पिढीच्या पारंपारिक पाणबुडी बनवण्यासाठी जवळपास १० अब्ज डॉलरचा मोठा करार होण्याची शक्यता आहे. या करारासाठी दोन्ही देश तयार आहेत. जर्मनी या बड्या संरक्षण करारासाठी तेव्हा हातमिळवणी करत आहे जेव्हा पाकिस्तान याआधीच अशी पाणबुडी खरेदी करण्यासाठी इच्छा प्रकट करत होता. त्यामुळे भारतासाठी हा करार मोठं यश मानलं जाऊ शकते.

भारत आणि जर्मनीत चर्चा पूर्ण - माहितीनुसार, भारत मार्चच्या अखेरपर्यंत पुढील पिढीतील पारंपारिक पाणबुडी उत्पादनासाठी अनेक अब्ज डॉलरच्या करारावर स्वाक्षरी करण्यास तयार आहे. जर्मनीसोबत दीर्घकालीन संबंध आणि निर्यात वाढवण्यासाठी आंतर-सरकारी करार (IGA) अंतिम झाला आहे आणि माझगाव डॉकयार्ड्स लिमिटेड (MDL) सोबत खर्चाच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत.

IGA वर अंतिम स्वाक्षरी करण्यासाठी जर्मनीचे संरक्षण मंत्री मार्चच्या अखेरीस भारतात येण्याची अपेक्षा आहे. त्यावेळी मुख्य करार एमडीएल आणि संरक्षण मंत्रालय यांच्यात स्वाक्षरी केली जाईल तर आयजीए तंत्रज्ञान हस्तांतरण, कर्मचारी प्रशिक्षण आणि प्रशासकीय मंजुरीसाठी व्यापक आश्वासने देण्यात येतील.

१० अब्ज डॉलरचा करार - MDL आणि जर्मनीच्या थिसेनक्रुप मरीन सिस्टम्स (TKMS) यांच्या भागीदारीत जानेवारी २०२५ मध्ये बोली प्रक्रियेचा आढावा घेणाऱ्या तांत्रिक देखरेख समितीने या बोलीला मान्यता दिली. गेल्या वर्षभरात खर्च आणि तांत्रिक तपशील अंतिम करण्याचे काम केले गेले आहे. ज्यामध्ये MDL ने प्रमुख भूमिका बजावली आहे. परंतु अंतिम कराराचे मूल्य अद्याप जाहीर झालेले नसले तरी ते सुमारे १० अब्ज डॉलर असण्याची अपेक्षा आहे. ज्यामध्ये लक्षणीय तंत्रज्ञान हस्तांतरण समाविष्ट असेल आणि भारतात औद्योगिक परिसंस्था निर्माण करून हजारो रोजगार निर्माण होतील.

६ पाणबुड्याचे उत्पादन, तंत्रज्ञान हस्तांतरण करणार जर्मनी- इतक्या मोठ्या प्रकल्पात ६ पाणबुड्याचे उत्पादन भारतात उच्चस्तरीय तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासह केले जाईल. या कराराच्या स्वाक्षरीनंतर जवळपास ७ वर्षांनी पहिली पाणबुडी सेवेत येण्याची शक्यता आहे. नव्या पाणबुडीत एक प्रमुख वैशिष्टय म्हणजे एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन प्रणाली त्यात असेल, ज्यामुळे २ आठवड्यापर्यंत पाण्याच्या आत राहण्याची क्षमता प्राप्त होईल.

या करारामुळे भारत आता जर्मनीसोबत युद्धनौका उत्पादन केंद्र म्हणून पुढे येऊ शकतो. जर्मनी कंपनी नव्या बाजाराच्या शोधात आहे. भारतीय जहाज उत्पादक हा खर्च खूप कमी प्रमाणात करू शकतात, ज्यातून या क्षेत्रात संयुक्त निर्यात शक्य होऊ शकते.

कशी असते HDW Class पाणबुडी?- एचडीडब्ल्यू वर्गातील पाणबुड्या या प्रगत पारंपारिक (नॉन-न्यूक्लियर) डिझेल-इलेक्ट्रिक जहाजे आहेत. ज्या जर्मनीच्या हॉवल्ड्सवेर्के-डॉयश वेर्फ्ट यांनी डिझाइन केल्या आहेत. त्या उच्च विश्वासार्हता आणि गुप्त तंत्रज्ञानाद्वारे सज्ज आहेत.

या पाणबुड्या - विशेषतः मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या टाइप २०९ आणि टाइप २१४ ज्या प्रगत एआयपीने सुसज्ज आहेत. किनारी ऑपरेशन्स, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि पाणबुडीविरोधी युद्धासाठी वापरल्या जातात. मागील २ दशकात केवळ ६ कलवरी श्रेणीतील पाणबुडया भारतीय नौदलात समाविष्ट केल्या आहेत.

पाकिस्तानला धक्का - जर्मनी पाकिस्तानला दीर्घकालीन विकास सहकार्य, द्विपक्षीय व्यापार आणि राजनैतिक उपक्रमांद्वारे कायम पाठिंबा देत राहिला आहे आणि १९५१ पासून त्यांनी सौहार्दपूर्ण संबंध राखले आहेत. जर्मनी हा पाकिस्तानसाठी मदत करणारा मोठा देश आहे. त्याने ऊर्जा, हवामान आणि व्यावसायिक प्रशिक्षण प्रकल्पांसाठी अब्जावधी युरो देण्याचे वचन दिले आहे आणि हा पाकिस्तानचा युरोपियन युनियनमधील एक प्रमुख व्यापारी भागीदार आहे.

१९६१ पासून जर्मनीने शाश्वत आर्थिक विकास, अक्षय ऊर्जा आणि आरोग्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या प्रकल्पांसाठी अंदाजे ३.८ अब्ज युरो देण्याचे वचन दिले आहे. पाकिस्तानने जर्मन तंत्रज्ञान विशेषतः थिसेनक्रुप मरीन सिस्टम्सची टाइप २१४ पाणबुडी आणि आयआरआयएस-टी एसएलएम हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करण्यात रस दर्शविला आहे.

















