चीनला जमलं नाही ते भारतानं करून दाखवलं; फक्त अमेरिकेने केला होता 'असा' पराक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 08:21 PM2023-06-15T20:21:10+5:302023-06-15T20:30:35+5:30

भारतीय नौदलाने अलीकडेच दोन विमानवाहू जहाजांसह हिंद महासागरात गस्त घालून आपले सामर्थ्य दाखवले. भारताचे हे लष्करी प्रदर्शन चीनला थेट इशारा देणारे मानले जात आहे. आतापर्यंत फक्त अमेरिकेने असा पराक्रम केला आहे.

भारताच्या या शक्तीप्रदर्शनाचे जगभरातून कौतुक होत आहे. भारताचे हे यश मोठे असल्याचे अमेरिकन लष्करी तज्ज्ञांचे मत आहे. लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत रशिया आणि चीन भारतापेक्षा खूप पुढे आहेत, पण त्यांनीही असा पराक्रम अद्याप केलेला नाही. इटली, जपान आणि ब्रिटनकडेही प्रत्येकी दोन विमानवाहू युद्धनौका आहेत, पण त्यांनाही असा पराक्रम करता आलेला नाही.

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजमधील नौदल आणि सागरी सुरक्षेचे वरिष्ठ फेलो निक चाइल्ड्स म्हणाले की, ही काही छोटी कामगिरी नाही. भारतीय नौदल हे जगातील मोजक्या देशांपैकी एक आहे जे एकापेक्षा जास्त विमानवाहू युद्धनौका चालवते असं यावरून असे दिसून येते.

भारतीय नौदलानुसार, INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत यांनी ३५ हून अधिक विमाने, युद्धनौका आणि पाणबुड्यांसह सरावाचे नेतृत्व केले. दोन विमानवाहू युद्धसमूहांचे यशस्वी संचलन हे समुद्रातील वर्चस्व राखण्याचा आणि समुद्रावरील हवाई शक्तीचे प्रात्यक्षिक असल्याचा दाखवून देते.

भारताने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दोन विमानवाहू युद्धनौका चालवण्याचा पराक्रम केला होता. स्वदेशी बनावटीची विमानवाहू युद्धनौका INS विक्रांत, ३ अब्ज डॉलर खर्च करून या महिन्यात भारतीय नौदलात दाखल झाली.

भारताच्या दुसऱ्या विमानवाहू नौकेचे नाव INS विक्रमादित्य आहे. भारताने २०१३ मध्ये रशियाकडून ते विकत घेतले होते. भारतापूर्वी गेल्या तीन वर्षांत केवळ ब्रिटन आणि चीनने स्वदेशी विमानवाहू युद्धनौका तयार केल्या होत्या.

विश्लेषकांनी सांगितले की चीन आणि ब्रिटन या दोन्ही देशांकडे त्यांच्या आधुनिक ताफ्यात एकापेक्षा जास्त विमानवाहू जहाजे आहेत, परंतु अद्याप दोघांनीही एकाच वेळी दोन विमानवाहू जहाजे चालवलेली नाहीत. आपल्या नौदलाचा इतिहास भारताला चीनच्या पुढे ठेवू शकतो असं सिंगापूरमधील एस. राजरत्नम स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजचे रिसर्च फेलो कॉलिन कोह म्हणाले.

चीनचे नौदल ही जगातील सर्वात मोठी नौदल आहे. चीनच्या ताफ्यात दोन विमानवाहू युद्धनौका आहेत, सोव्हिएत-निर्मित लिओनिंग आणि देशांतर्गत बांधलेले शेंडोंग, तर तिसरा वाहक, फुजियान लाँन्च केला गेला आहे परंतु अद्याप कार्यान्वित झालेला नाही.

कोह म्हणाले की, भारतीय नौदलाकडे विमानवाहू युद्धनौका ऑपरेशन्सचा दशकांचा अनुभव आणि कौशल्य आहे. बहुधा याच कारणामुळे भारतीय नौदल चीनच्या नौदलावर मात करेल. या प्रदेशात चीन हा भारताचा प्रमुख प्रतिस्पर्धी आहे.

यूएस नेव्हीचे माजी कॅप्टन कार्ल शुस्टर यांनी सांगितले की, या आठवड्यात भारताच्या दोन विमानवाहू युद्धनौकांच्या एकाचवेळी झालेल्या ऑपरेशनने भारतीय नौदलाचं सामर्थ्य दिसून आले. भारताने १९६१ मध्ये पहिली विमानवाहू नौका चालवली आणि १९८७ मध्ये दुसरी जोडली. १९८७ ते १९९७ आणि २०१३ आणि २०१७ दरम्यान याआधीच्या दोन प्रसंगी त्यांनी दोन विमानवाहू जहाजे चालवली आहेत. भारतीय नौदल नेहमीच उच्च प्रशिक्षित, कडक शिस्तबद्ध आणि अत्यंत कार्यक्षम दल आहे असं कौतुक त्यांनी केले.