वय तिशीच्या आत अन् देशासाठी कुर्बान; पाच शहीद क्रांतिकारकांबद्दल, जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 02:04 PM2022-08-14T14:04:09+5:302022-08-14T14:15:39+5:30

Independence Day : (संकलन- समीर परांजपे) : युवा क्रांतिकारकांचे ध्येय होते देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे. अशा पाच शहीद क्रांतिकारकांबद्दल...

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आबालवृद्धांचा सहभाग होता. त्यातील काहीजण वयाच्या २३ व्या किंवा २५ व्या वर्षी देशासाठी शहीद झाले. युवावस्थेत प्रत्येकाची आयुष्याविषयी काही स्वप्ने असतात. पण या युवा क्रांतिकारकांचे ध्येय होते देशाला स्वातंत्र्य मिळवून देणे. अशा पाच शहीद क्रांतिकारकांबद्दल...

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील नगवा गावी जन्मलेले मंगल पांडे हे १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात शहीद झाले. त्यावेळी त्यांचे वय फक्त ३० वर्षांचे होते. ब्रिटिश बंदुकांसाठी काडतुसांना गाय किंवा डुकरांची चरबी लावायचे. एका धर्मीयांना गाय पवित्र व दुसऱ्या धर्मीयांना डुक्कर निषिद्ध. त्यामुळे ही काडतुसे वापरण्यास ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातील भारतीय सैनिकांचा तीव्र विरोध होता. ३४ व्या बंगाल नेटिव्ह इन्फन्ट्रीमध्ये २९ मार्च १८५७ रोजी एक घटना घडली. त्या इन्फ्रन्ट्रीमधील सैनिक मंगल पांडे यांचा नवी काडतुसे वापरण्यास विरोध होता. मंगल पांडे यांनी ब्रिटिश अधिकारी मेजर ह्यूसन याची रायफल खेचून त्याला ठार केले. त्यांना ८ एप्रिल १८५७ रोजी फाशी देण्यात आली. त्यांच्या बलिदानानंतर काही दिवसांतच १८५७चे स्वातंत्र्यसमर सुरू झाले.

क्रांतिकारक भगतसिंह यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०७ रोजी झाला. जालियनवाला हत्याकांडाबद्दल भगतसिंग यांच्या मनात चीड होती. ते चंद्रशेखर आझाद यांच्या दलात सामील झाले. आझाद यांच्या हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे रूपांतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनमध्ये करण्यात आले. भगतसिंग यांनी राजगुरू यांच्यासमवेत १९२८मध्ये लाहोरचे सहायक पोलीस अधीक्षक जे. पी. सँडर्स यांचा वध केला. त्यानंतर त्यांनी बटुकेश्वर दत्तसमवेत दिल्लीत तत्कालीन सेंट्रल असेंब्ली सभागृहात बॉम्ब फेकले. देशभक्तीपर घोषणा दिल्या. नंतर स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन झाले. खटला चालला. क्रांतिकारक भगतसिंग यांना जुलमी ब्रिटिश सरकारने २३ मार्च १९३१ रोजी फाशी दिले. त्यावेळी भगतसिंग यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते.

चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै १९०६ रोजी मध्य प्रदेशमधील भाबर येथे झाला. त्यांचे नाव चंद्रशेखर तिवारी. लोक त्यांना आदराने चंद्रशेखर आझाद म्हणत. १४ व्या वर्षी ते मध्य प्रदेशातून बनारसला आले. संस्कृत शिकण्यास सुरुवात केली. याच काळात स्वातंत्र्य चळवळीतही सहभागी झाले. १९२०-२१ साली गांधीजींच्या आंदोलनाशी ते जोडले गेले. १९२६ साली काकोरी ट्रेनमधील सरकारी खजिना लुटणे, व्हाॅईसराॅयची ट्रेन उडवून देण्याचा प्रयत्न, १९२८ साली लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यास सँडर्सवर केलेला गोळीबार असो या देशभक्तीपर घटनांत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. २७ फेब्रुवारी १९३१ रोजी प्रयागराज येथील आल्फ्रेड पार्कमध्ये चंद्रशेखर आझाद क्रांतिकारक सहकाऱ्यांशी चर्चा करत असताना पोलिसांनी त्यांना घेरले. गोळीबारात चंद्रशेखर आझाद यांनी तीन जणांना यमसदनी पाठविले. शेवटची गोळी उरल्यानंतर त्यांनी स्वत:वर गोळी झाडून हौतात्म्य पत्करले. त्यांचे वय अवघे २५ होते.

हसत हसत फासावर चढलेल्या युवा क्रांतिकारकांमध्ये राजगुरू यांचा समावेश होता. त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील खेड हे आहे. त्यांचे पूर्ण नाव शिवराम हरी राजगुरू असे होते. वयाच्या सहाव्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कालांतराने राजगुरू संस्कृतचे शिक्षण घेण्यासाठी वाराणसी येथे गेले. तिथे ते चंद्रशेखर आझाद व हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशनच्या संपर्कात आले. ब्रिटिश अधिकारी सँडर्सच्या हत्या कटात राजगुरू सामील होते. दिल्लीत सेंट्रल असेंब्ली हॉलमध्ये बाॅम्ब फेकण्याच्या क्रांतिकारी कृत्यातही ते सहभागी झाले होते. २३ मार्च १९३१ रोजी वयाच्या २३ व्या वर्षी राजगुरू यांना फाशी देण्यात आले. याच वेळी भगतसिंग व सुखदेव यांनाही फाशी देण्यात आली होती.

सुखदेव थापर यांचा जन्म पंजाबमधील लुधियाना शहरात १५ मे १९०७ रोजी झाला. सुखदेव तीन महिन्यांचे असताना वडिलांचे निधन झाले. त्यानंतर त्यांचे पालनपोषण त्यांचे नातेवाईक अचिंतराम यांनी केले. लाला लजपत राय यांच्या व्यक्तिमत्वाचा सुखदेव यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांच्याच माध्यमातून ते चंद्रशेखर आझाद यांच्या संघटनेत सामील झाले. लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी चंद्रशेखर यांनी एक योजना तयार केली होती. त्यात सुखदेवदेखील सामील होते. ब्रिटिश अधिकारी सँडर्स याची हत्या करण्याच्या क्रांतिकारी कृत्यात सुखदेव सहभागी होते. तुरुंगात कैद्यांना ब्रिटिशांकडून जी वाईट वागणूक दिली जाते त्याविरोधात सुखदेव यांनी आंदोलन केले होते. २३ मार्च १९३१ रोजी भगतसिंग, राजगुरू यांच्यासह सुखदेव यांनादेखील फाशी देण्यात आले. त्यावेळी सुखदेव यांचे वय अवघे २३ वर्षांचे होते.