रीलचं वेड! विवाहित महिला मुस्लिम तरूणाच्या प्रेमात; पतीला कायमचं संपवलं, पोलिसांनी पकडलीच

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 07:59 PM2024-01-11T19:59:54+5:302024-01-11T20:07:49+5:30

इंस्टाग्रामवर रील बनवण्याची आवड असलेली विवाहित महिला एका मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली अन् वादाच्या भोवऱ्यात सापडली.

हे सोशल मीडियाचं जग आहे, इथे कोण कधी प्रसिद्धीच्या झोतात येईल याची कल्पना न केलेलीच बरी... प्रसिद्धीसाठी कोणत्याही थराला जाणारी मंडळी समाजात आहे. अशीच एक इंस्टाग्रामवर रील बनवण्याची आवड असलेली विवाहित महिला एका मुस्लिम मुलाच्या प्रेमात पडली अन् वादाच्या भोवऱ्यात सापडली.

तिने नात्याला काळीमा फासत आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आणि नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आत्महत्येचा प्रकार घडवून आणला. प्रकरणाचं सत्य समोर येताच सर्वांनाच धक्का बसला. ही धक्कादायक घटना बिहारमधील बेगुसराय येथील आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तपास सुरू केला. आरोपी महिलेला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलं आहे.

मात्र, महिलेचा प्रियकर शहजाद अद्याप पोलिसांना सापडला नाही. प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या करणाऱ्या आरोपी महिलेचं ७ वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. ७ जानेवारी रोजी तिनं पतीची हत्या केली होती.

स्थानिक पोलिसांना फाफोट या परिसरात एका तरुणाचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला होता. मृत महेश्वर रायच्या कुटुंबीयांनी त्यांचीच सून राणी राय हिच्यावर हत्या केल्याचा आरोप केला.

माहितीनुसार, सात वर्षांपूर्वी महेश्वर राय आणि राणी रायचं लग्न झालं होतं. लग्नानंतर सर्व काही ठीक चालले होते पण ४ वर्षांपूर्वी राणी रायला इंस्टाग्रामवर रील बनवण्याचे व्यसन जडले. राणीच्या या कृतीनंतर तिचा पती महेश्वर रायने तिला अनेकदा समजावण्याचा प्रयत्न केला आणि रील बनवण्यास नकार दिला.

रील बनवण्यास पतीचा नकार होता. पण तिने त्याचे ऐकले नाही. दरम्यान, ती सोशल मीडियावर एका मुस्लिम तरुणाच्या संपर्कात आली आणि दोघांची मैत्री झाली. कालांतराने या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

अखेर ७ जानेवारीला राणीने तिचा प्रियकर शहजादच्या मदतीने पती महेश्वर राय याचा दुपट्ट्याने गळफास लावून खून केला आणि पोलिसांची दिशाभूल केली. मात्र पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता.

पोलिसांनी राणी रायची इंस्टाग्राम आयडी तपासली तेव्हा तिचे दहा हजारांहून अधिक फॉलोअर्स होते. इंस्टाग्रामवरील एका रीलमध्ये राणी रायने कबूल केले होते की, ती शहजाद नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध आहेत.

आरोपी महिलेचा पती महेश्वर राय यालाही याची माहिती होती, त्यामुळेच राणीने त्याला मार्गातून दूर केले आणि पतीला कायमचे संपवले. याप्रकरणी पोलिसांनी राणी रायच्या लहान बहिणीचीही चौकशी केली आहे. लवकरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होऊन सर्व आरोपींना अटक करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.