CoronaVirus News: आता Deodorant कोरोनाला रोखणार; भारतीय विद्यार्थ्यांनी मिळवलं पेटंट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 07:00 PM2020-07-02T19:00:39+5:302020-07-02T19:09:25+5:30

संपूर्ण जगाला कोरोना व्हायरसने विळखा घातला आहे. भारतातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या ६, ०१, ९५२ वर पोहचली आहे. यापैकी ३,५७,६१२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर १७, ७८५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

त्यामुळे कोरोनासारख्या संकटावर मात करण्यासाठी सर्व देशातील सरकार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे. तसेच कोरोनाच्या उपचारासाठी लसीची चाचणी देखील अनेक देशात करण्यात येत आहे. त्यातच आता एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.

आपण नेहमी फ्रेश वाटावं आणि शरिराला घामाची दुर्गंधी येऊ नये, यासाठी 'डिओडोरंट'चा (Deodorant)वापर करतो. मात्र आता हाच डिओडोरंट कोरोनाला दूर ठेवण्यासाठी देखील उपयोगी होणार आहे.

आयआयटी कानपूरच्या माजी विद्यार्थी आणि आयआयटी गुवाहाटीच्या प्राध्यापकांनी मिळून डिओडोरंट कम सॅनिटायझर तयार केला आहे. या डिओडोरंटमध्ये सॅनिटायझरचे काही घटक असणार आहे. हे घटक कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

डिओडोरंट कम सॅनिटायझर त्वचा आणि पर्यावरणासाठी सुरक्षित असणार आहे. या डिओडोरंटसाठी आम्हाला पेटंट मिळालं आहे, अशी माहिती देखील विद्यार्थ्यांनी दिली आहे. त्यामुळे डिओडोरंट कम सॅनिटायझर लवकरच बाजारपेठेत देखील उपलब्ध होईल, असा दावा देखील करण्यात आला आहे.

कोरोनावरील उपचारांसाठी कोणतीही लस दिली गेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही आपली लस तयार करण्यास किमान एक वर्ष लागणार असल्याचे म्हटले आहे. चीन, अमेरिका आणि भारत यासह 50 देशांमध्ये, शास्त्रज्ञ आज कोरोना लस तयार करण्यासाठी काम करत आहेत.