नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 18:23 IST2025-10-12T18:19:29+5:302025-10-12T18:23:27+5:30
IAS Nagarjun B Gowda : IAS अधिकारी सृष्टी देशमुख यांचे पती असलेले IAS अधिकारी डॉ. नागार्जुन बी. गौडा सध्या चर्चेत आले आहेत.

IAS Nagarjun B Gowda : चर्चित IAS अधिकारी सृष्टी देशमुख यांचे पती आणि सध्या मध्य प्रदेशमध्ये कार्यरत असलेले IAS अधिकारी डॉ. नागार्जुन बी. गौडा सध्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्यावर एका रस्ता बांधकाम कंपनीला कोट्यवधी रुपयांचा फायदा करुन दिल्याचा आणि ₹१० कोटी रुपये लाच घेतल्याचा आरोप आहे. गौडा यांनी कंपनीवर लावलेला ₹५१ कोटींचा दंड बदलून फक्त ₹४,०३२ रुपयांवर आणला. मात्र, संबंधित अधिकाऱ्याने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
डॉ. नागार्जुन गौडा हे २०१९ बॅचचे IAS अधिकारी असून, सध्या खंडवा जिल्हा पंचायतचे CEO म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यावरचा आरोप हरदा जिल्ह्यातील उत्खनन प्रकरणाशी संबंधित आहे. आरटीआय कार्यकर्ते आनंद जाट यांनी असा आरोप केला आहे की, हरद्यात एसडीएम म्हणून कार्यरत असताना गौडांनी “पथ इंडिया” नावाच्या कंपनीवर लावलेला ₹५१ कोटींचा दंड रद्द करून फक्त ₹४,०३२ इतका केला. त्याचबरोबर, त्यांनी या बदल्यात १० कोटी रुपयांची लाच घेतल्याचेही आरोपपत्रात म्हटले आहे.
हे प्रकरण इंदूर-बैतूल नॅशनल हायवे प्रोजेक्टशी संबंधित आहे. “पथ इंडिया” या कंपनीला तिथे वाळू आणि खनिज उत्खननाची परवानगी होती, परंतु आरोपानुसार कंपनीने ३.११ लाख घनमीटर वाळूचे बेकायदेशीर उत्खनन केले. यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले. त्यानंतर तत्कालीन ADM यांनी कंपनीवर ₹५१ कोटींचा दंड लावला. मात्र, आरोप असा आहे की, पुढे IAS गौडांनी खनन क्षेत्राची मर्यादा २,६८८ घनमीटर इतकी ठरवत दंड ₹४,०३२ केला आणि कंपनीला प्रचंड आर्थिक फायदा मिळवून दिला.
या प्रकरणावर सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. सर्वत्र टीका होत असताना, डॉ. गौडांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. त्यांनी म्हटले की, या प्रकरणातील नोटीस माझ्या आधीच जारी झाली होती. मी जेव्हा पदावर आलो, तेव्हा सुनावणी जवळपास पूर्ण झाली होती. माझ्या निर्णयानंतर दोन वर्षे कोणतीही तक्रार आली नाही, याचा अर्थ माझा निर्णय योग्य होता. तसेच त्यांनी आरटीआय कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल असल्याचा उल्लेख केला आणि काही मीडिया संस्थांवर “सेंसेशनल रिपोर्टिंगचा आरोप” केला.
डॉ. गौडा मूळचे कर्नाटकचे असून त्यांनी एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केले आहे. डॉक्टर असताना त्यांनी UPSC ची तयारी केली आणि २०१८ मध्ये AIR ४१८वी रँक मिळवली. त्यांची पत्नी IAS सृष्टि जयंत देशमुख यांनीदेखील त्याच वर्षी देशभरात ५वी रँक मिळवली होती. दोघांची ओळख मसूरीतील LBSNAA ट्रेनिंगदरम्यान झाली आणि त्यांनी एप्रिल २०२२ मध्ये विवाह केला. सध्या दोघांचीही खंडवा शहरातच नियुक्ती आहे.
विशेष म्हणजे, IAS कपलने मिळून ‘The Manual on Ethics, Integrity and Aptitude’ आणि ‘The Answer Writing Manual’ या UPSC विद्यार्थ्यांसाठी लोकप्रिय पुस्तके लिहिली आहेत. मात्र, आता सोशल मीडियावर लोक यावरुन त्यांच्यावर टीका करत आहेत. लोकांना नैतिकता शिकवणारा अधिकारी स्वतः अशा गैरप्रकारात गुंतला, अशाप्रकारची टीका होत आहे.