विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 14:11 IST2025-07-13T14:07:39+5:302025-07-13T14:11:31+5:30
C. Sadanandan Master: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चार व्यक्तींची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सी. सदानंदन मास्टर यांचाही समावेश आहे. ऐन तारुण्यात विरोधकांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोन पाय गमावल्यानंतरही राजकीय संघर्ष आणि समाजकार्य सुरू ठेवणारे सदानंदन मास्टर कोण आहेत, हे आज आपण जाणून घेऊयात.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चार व्यक्तींची राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे. यामध्ये सी. सदानंदन मास्टर यांचाही समावेश आहे. ऐन तारुण्यात विरोधकांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यात दोन पाय गमावल्यानंतरही राजकीय संघर्ष आणि समाजकार्य सुरू ठेवणारे सदानंदन मास्टर कोण आहेत, हे आज आपण जाणून घेऊयात.
सदानंदन मास्टर यांचा जन्म केरळमधील कन्नूर जिल्ह्यात झाला होता. केरळमधील इतर कुटुंबांप्रमाणेच त्यांच्या कुटुंबामध्ये डाव्या विचारांचा पगडा होता. मात्र सदानंदन हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे आकर्षित होऊन वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी संघ स्वयंसेवक बनले होते.
दरम्यान, २५ जानेवारी १९९४ रोजी सदानंदन यांच्यावर त्यांच्या राजकीय विरोधकांनी जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात त्यांना दोन्ही पाय गमवावे लागले होते. त्यावेळी त्यांचं वय सुमारे ३० वर्षे एवढं होतं. हा हल्ला डाव्या विचारांच्या माकपाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचे सांगण्यात येते. मात्र या हल्ल्यानंतरही सदानंदन यांनी आपलं राजकीय आणि सामाजिक कार्य थांबवलं नाही.
पेशाने शिक्षक असलेल्या सदानंदन यांनी १९९९ ते २०२० या काळात केरळमधील एका शाळेत शिक्षक म्हणून काम केले होते. ते केरळमधील राष्ट्रीय शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. तसेच देशीय अध्यापक वार्था या नियतकालिकाचे संपादक आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या कार्याचं कौतुक करताना त्यांचं कार्य प्रेरणादायक असल्याचे म्हटले होते. सदानंदन मास्टर यांचं जीवन धैर्य आणि अन्यायासमोर न झुकण्याचं उदाहरण आहे, असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.
सदानंदन मास्टर यांनी २०२१ मध्ये केरळ विधानसभेची निवडणूक लढवली होती. सदानंदन यांची पत्नीसुद्धा पेशाने शिक्षक असून, त्यांची मुलगीही उच्चशिक्षित आहे.
दरम्यान, आता सदानंदन मास्टर यांना त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची दखल घेत राष्ट्रपतींनी घटनेतील कलम ८० (३) नुसार राज्यसभेवर सदस्य म्हणून नियुक्त केलं आहे.