आता 'या' राज्यात महिलांच्या खात्यात 2100 नाही, थेट 6300 रुपये जमा होणार! सरकारचा मोठा निर्णय, खुद्द मुख्यमंत्र्यांनीच सांगितला नवा 'प्लॅन'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2025 16:53 IST2025-12-04T16:45:28+5:302025-12-04T16:53:22+5:30
या योजनेसाठी २३ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला पात्र असून, किमान १५ वर्षांपासून राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे...

देशभरात विविध राज्यांतील सरकारांकडून महिलांसाठी वेगवेगळ्या योजना चालवल्या जात आहेत. याच पद्धतीने हरियाणामध्येही 'लाडो लक्ष्मी' नावाने योजना चालवली जाते. या योजनेंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 2100 रुपये दिले जातात. मात्र आता सरकार यात मोठा बदल करत आहे.

हरियाणातील नायब सैनी सरकारने नुकतीच या 'लाडो लक्ष्मी' योजनेचा दुसरा हप्ता जारी केला. त्यांनी कार्यक्रमात बटण दाबून ही रक्कम जारी केली. यामुळे लाखो महिलांच्या खात्यात थेट २१०० रुपये जमा झाले. १ नोव्हेंबरला पहिला हप्ता जारी झाल्यापासून आतापर्यंत सात लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळात आहे.

दुसरा हप्ता जारी करताच मुख्यमंत्री म्हणाले, दिलेली आश्वासने सरकार वेळेवर पूर्ण करत आहे. याच वेळी, 'लाडो लक्ष्मी' योजना अधिक मजबूत करण्यासाठी आता पैसे जमा करण्याच्या पद्धतीत बदल केला जात आहे.

या बदलामुळे महिलांना त्यांच्या मोठ्या गरजांसाठी अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करता येईल. योजनेतील मुख्यबदल असा असेल की, आता दर महिन्याला 2100 रुपये देण्या ऐवजी, सरकार दर तीन महिन्याला एकाच वेळी 6300 रुपये जमा करेल. रक्कम तीच असेल, पण एकगठ्ठा मिळेल.

यामुळे मोठ्या खर्चाचे नियोजन करणे सोपे होईल आणि ट्रांजॅक्शनची संख्याही कमी होईल. यामुळे योजनेचा परिणाम आणखी चांगला होईल, असा सरकारचा तर्क आहे. या योजनेतील अर्ज आणि पडताळणी प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे.

मुख्यमंत्री सैनी यांनी दिलेल्या माहिती नुसार, दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी 'लाडो लक्ष्मी अॅप' सुरू करण्यात आले होते. आतापर्यंत ५ लाख ५८ हजारांहून अधिक महिलांनी आधार केवायसी पूर्ण केली असून, सुमारे १ लाख ४३ हजार महिलांची पडताळणी प्रलंबित आहे. अर्ज पूर्ण झाल्यावर २४ ते ४८ तासांत तपासणी केली जाते.

या योजनेसाठी २३ वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या महिला पात्र असून, किमान १५ वर्षांपासून हरियाणाचे रहिवासी असणे आवश्यक आहे. याशिवाय, कुटुंबाचे उत्पन्नही निश्चित करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे, एकाच कुटुंबातील अनेक महिला देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

















