सॅल्यूट! मूत्रपिंड, यकृत, फुफ्फुस अन् डोळे केले दान...दोन मित्रांनी मृत्यूनंतर १२ जणांना दिलं जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 10:54 AM2021-09-01T10:54:42+5:302021-09-01T10:59:01+5:30

गुजरातच्या सूरतमधले दोन तरुण समाजासाठी अनोखा आदर्श ठरले आहेत. बालपणीच्या या दोन मित्रांनी आपल्या मृत्यूनंतर आपले अवयव दान केले आहेत.

गुजरातच्या सूरत येथे ब्रेनडेड झाल्यानं जगाचा निरोप घेतलेले दोन बालपणीचे मित्र समाजासाठी आदर्श ठरले आहेत. कारण दोघांचाही मृत्यू झालेला असला तरी त्यांनी जगाचा निरोप घेतल्यानंतर १२ जणांना जीवदान दिलं आहे. ब्रेन डेड झालेल्या या दोन जिगरी मित्रांच्या कुटुंबीयांनी सूरत येथील लाइफ संस्थेच्या माध्यमातून दोघांचे अवयव डोनेट केले आहेत. याचा मरणाच्या दारात असलेल्या १२ रुग्णांना फायदा झाला आहे. सूरतच्या रुग्णालयात एकाच वेळी तब्बल १३ अवयव एकाच वेळी दान केले जाण्याची ही पहिलीच घटना आहे.

सूरतमध्ये राहणाऱ्या १८ वर्षीय मीत पंड्या आणि १८ वर्षीय क्रिश गांधी यांचा २४ ऑगस्ट रोजी जीडी गोयंका शाळेजवळ अपघात झाला होता. त्यानंतर दोघांवर पीपलोद परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान दोघंही ब्रेनडेड अवस्थेत गेल्याचं डॉक्टरांनी घोषीत केलं होतं.

या घटनेची माहिती डोनेट लाइफ संस्थेच्या नीलेश मांडलेवाला यांना मिळाली आणि ते रुग्णालयात पोहोचले. त्यांनी कुटुंबीयांना दोन्ही मृत युवकांचे अवयव दान करण्याबाबत आवाहन केलं. दोन्ही मुलांचे कुटुंबीय देखील मोठ्या मनानं अवयव दानासाठी तयार झाले. त्यानंतर कुटुंबीयांनी दोन्ही मुलांचं मूत्रपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुसं आणि डोळे दान केले.

मीत आणि क्रिश यांच्या अवयव दानामुळे एकूण १२ जणांना जीवदान मिळालं आहे. इयत्ता १२ वीचं शिक्षण घेत असलेल्या क्रिश गांधी याचा २४ ऑगस्ट रोजी वाढदिवस होता आणि त्याचं सेलिब्रेशन केल्यानंतर दोघं आपल्या मोटारसायकलवरुन घरी परतत होते. त्याचवेळी एका भरधाव कारचालकानं मोटारसायकलला धडक दिली आणि भीषण अपघात घडला. यात क्रिश आणि मीत गंभीर जखमी झाले होते.

पोलिसांनी याप्रकरणी आरोपी कार चालकाला अटक केली आहे. रिझवान शेख असं आरोपीचं नाव असून तो एक कपडे व्यापारी असल्याचं समोर आलं आहे. क्रीश आणि मीत यांच्या मृत्यूनंतर अवयव दान केले. दोघांनीही दान केलेले अवयव ग्रीन कॉरिडोअरच्या माध्यमातून अहमदाबाद आणि हैदराबादला पोहोचविण्याचं काम करण्यात आलं.

सूरतहून हैदराबादला म्हणजेच जवळपास ९२६ किमी दूर १८० मिनिटांचा प्रवास करत क्रिश गांधी याचं फुफ्फुस सीआरपीएफच्या पुणे युनिटमध्ये तैनात असलेले ५४ वर्षीय जवानामध्ये त्याचं ट्रान्सप्लांट करण्यात आलं. गेल्या दिड वर्षांपासून ते ऑक्सिजनवर होते.

याच पद्धतीनं सूरत ते अहमदाबाद असा २८८ किमी प्रवास करत मीड पंड्यानं दान केलेलं हृदय हे बडोदा येथील २१ वर्षीय तरुणीच्या शरिरात ट्रान्सप्लांट करण्यात आलं. तर क्रिश गांधी याचं यकृत राजकोटच्या ५५ वर्षीय व्यक्तीत ट्रान्सप्लांट करण्यात आलं. मीत पंड्याचं यकृत एका ४७ वर्षीय शिक्षकासाठी जीवदान देणारं ठरलं आहे.

मीत आणि क्रिश यांनी दान केलेली त्यांनी मूत्रपिंड देखील गरजू लोकांमध्ये ट्रान्सप्लांट करण्यात येणार आहेत. Institute of Kidney Diseases and Research Centre मध्ये ट्रान्सप्लांट केलं जाणार आहे.

Read in English