जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2025 09:16 IST2025-12-14T09:10:06+5:302025-12-14T09:16:43+5:30
Karnataka Gold and Lithium block : कर्नाटकात कोप्पल, रायचूर जिल्ह्यात सोने (१४ ग्रॅम/टन) आणि लिथियमचा मोठा साठा सापडला. मात्र आरक्षित वनक्षेत्रामुळे उत्खनन थांबले. कोट्यवधींच्या खजिन्याची संपूर्ण माहिती वाचा.

भारताला कर्नाटकात भूगर्भात दडलेला एक मोठा खजिना सापडला आहे. राज्याच्या कोप्पल आणि रायचूर जिल्ह्यांतील आरक्षित वनक्षेत्रात सोन्याचा प्रचंड मोठा साठा आणि बॅटरीसाठी महत्त्वाचे असलेले लिथियमचे अंश सापडल्याची माहिती समोर आली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोप्पल जिल्ह्यातील अमरापूर ब्लॉकमध्ये सापडलेल्या सोन्याचा 'ग्रेड' (प्रमाण) प्रति टन १२ ते १४ ग्रॅम इतका उच्च आहे. सामान्यतः, २ ते ३ ग्रॅम प्रति टन सोन्याचा साठा देखील उत्खननासाठी फायदेशीर मानला जातो.

जर खोलवरही हेच प्रमाण ८ ते १० ग्रॅम प्रति टन राखले गेले, तर या खाणीतून दररोज २५ ते ३० किलोग्राम सोने काढले जाऊ शकते, ज्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असेल.

कोप्पलसोबतच, रायचूर जिल्ह्यातील अमृतेश्वर ब्लॉकमध्ये बॅटरी उद्योगासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लिथियमचे अंश पेग्माटाइट खडकांमध्ये आढळले आहेत. यामुळे लिथियम साठ्याच्या राज्यांच्या यादीत आता जम्मू-काश्मीर आणि छत्तीसगडसोबत कर्नाटकचाही समावेश झाला आहे.

राज्याच्या खाण आणि भूविज्ञान विभागाने नोव्हेंबर २०२५ मध्ये ६५ ब्लॉकमध्ये केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती निश्चित केली आहे.

हा साठा अत्यंत मौल्यवान असला तरी, तो आरक्षित वनक्षेत्रे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या भागात आहे. त्यामुळे पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या 'स्टेज-I' मंजुरीशिवाय १० मीटरपेक्षा जास्त खोलवर ड्रिलिंग (उत्खनन) करण्याची परवानगी नाही.

वन विभाग आणि पर्यावरण संस्थांनी यावर आक्षेप घेतल्यामुळे, सध्या या खजिन्याचे उत्खनन थांबले आहे. मंत्रालयाच्या मंजुरीनंतरच हा कोट्यवधींचा खजिना भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी वापरला जाऊ शकेल.

















