भाजपा खासदाराची 'शतकी' खेळी; क्रिकेटच्या मैदानात ठाकरेंच्या खासदारानं किती रन्स केले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:00 IST2024-12-16T11:56:11+5:302024-12-16T12:00:15+5:30

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात बराच गदारोळ आणि गोंधळ पाहायला मिळतो. परंतु यात रविवारी संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांमधील विविध पक्षांचे खासदार क्रिकेटच्या मैदानात एकत्र दिसले. लोकसभा आणि राज्यसभा टीम यांच्यात टी२० मॅचचे आयोजन करण्यात आले होते.
या क्रिकेटच्या सामन्यात लोकसभा XI ने राज्यसभा XI यांचा ७३ धावांनी पराभव केला. लोकसभा खासदार अनुराग ठाकूर आणि चंद्रशेखर यांच्या पार्टनरशिपमुळे लोकसभा XI टीमने धावांचा डोंगर उभा केला. त्यात भाजपा आमदार अनुराग ठाकूर यांनी तुफान फटकेबाजी करत शतक झळकावलं.
लोकसभा XI टीमने प्रथम फल्लंदाजी केली. त्यात अनुराग ठाकूर आणि चंद्रशेखर आझाद यांची जोडी खूप काळ मैदानात राहिली. अनुराग ठाकूर यांनी ६५ चेंडूत नाबाद १११ धावा ठोकल्या तर चंद्रशेखर यांनी २३ चेंडूत ५४ रन्स केल्या. या खेळीमुळे लोकसभा XI टीमला २० षटकांत ७ विकेट गमावून २५१ धावांचा आव्हानात्मक स्कोअर बनवता आला.
लोकसभा XI टीमच्या २५२ धावांचा पाठलाग करत राज्यसभा XI टीमने २० षटकांत ८ विकेट गमावून १७८ धावा केल्या. राज्यसभेच्या टीममधून मोहम्मद अजहरुद्दीन यांनी सर्वाधिक ४२ चेंडूत ७४ धावा केल्या. मात्र इतर खासदारांच्या खेळीमुळे राज्यसभा XI टीमला लोकसभा टीमकडून पराभव पत्करावा लागला.
टीबीविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी खासदारांमध्ये मैत्रीपूर्ण मॅचचं आयोजन करण्यात आले होते. त्यात खासदार मनोज तिवारी यांना सुपर कॅच ऑफ द मॅचचा विशेष पुरस्कार मिळाला. तर काँग्रेस खासदार दीपेंद्र हुड्डा यांना सर्वोकृष्ट गोलंदाज हा पुरस्कार देण्यात आला. खासदार निशिकांत दुबे यांना बेस्ट फिल्डरने सन्मानित करण्यात आले.
राज्यसभा इलेव्हन विरुद्ध लोकसभा इलेव्हन या क्रिकेट सामन्यातून टीबी या आजाराविषयी जागरुकता निर्माण करण्यात आली. या सामन्यात सर्व खासदारांनी जर्सी घातली होती त्यावरही टीबी हारेगा और भारत जितेगा अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला होता. दिल्लीच्या मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडिअमवर हा सामना खेळवला गेला.
लोकसभा XI टीमची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. अवघ्या २० धावांच्या आत त्यांचे सलामीचे फलंदाज मनोज तिवारी आणि दीपेंद्र सिंह हुड्डा पॅव्हेलियनला परतले. हुड्डा यांना ६ धावांवर किरेन रिजिजू यांनी एलबीडब्ल्यू आऊट केले. मनोज तिवारी यांनी १३ धावा बनवल्या. त्यांना सौमित्र खान यांच्या चेंडूवर कॉट अँन्ड बोल्ड आऊट करण्यात आले.
त्यानंतर कॅप्टन अनुराग ठाकूर यांनी त्यांच्या खांद्यावर टीमची जबाबदारी घेतली. चंद्रशेखर आझाद यांनी त्यांना चांगली साथ दिली. या दोघांनी शतकी भागीदारी केली. अनुराग ठाकूर यांनी ६५ चेंडूत १११ धावा केल्या. चंद्रशेखर यांनी २३ चेंडूत ५४ धावा पटकावल्या. कमलेश पासवान यांनी चंद्रशेखर यांना क्लीन बोल्ड करून दोघांची भागीदारी तोडली.
या दोघांनंतर फलंदाजी करण्यास आलेले गुरमीत हायर यांनी केवळ ७ रन्स केल्या. राम मोहन नायडू यांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. देवेश शाक्य यांनी ३ रन्स बनवल्या, त्यांना मोहम्मद अजहरुद्दीन यांनी बोल्ड केले. दुष्यंत सिंह ५ धावांवर बाद झाले. त्यानंतर ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर मैदानात उतरले त्यांनी ३ चेंडू खेळले परंतु शून्यावर नॉटआऊट राहिले. यानंतर पहिली इनिंग संपली.
लोकसभा इलेव्हनने दिलेल्या २५२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राज्यसभा इलेव्हन संघाची सुरुवात चांगली झाली नाही आणि कॅप्टन किरेन रिजिजू केवळ १ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले. अजहरुद्दीन आणि कमलेश पासवानसह डावाची धुरा सांभाळली. दोघांमध्ये शतकी भागीदारी झाली. परंतु राज्यसभा XI टीम पराभूत झाली.