तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:23 IST2026-04-07T15:16:11+5:302026-04-07T15:23:26+5:30
Assembly Election 2026: पुढच्या काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. त्यापैकी केरळ, आसाम आमि पुद्दुचेरीमध्ये आज प्रचाराची समाप्ती होणार आहे. तत्पूर्वी या चारही राज्यांमधील निवडणुकीचा कल दाखवणारा एक ओपिनियन पोल समोर आला असून, त्यामधून यापैकी काही राज्यांमध्ये निवडणुकीची हवा बदलताना दिसत आहे.

पुढच्या काही दिवसांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू आणि केरळ या चार राज्यांसह पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे. त्यापैकी केरळ, आसाम आमि पुद्दुचेरीमध्ये आज प्रचाराची समाप्ती होणार आहे. तत्पूर्वी या चारही राज्यांमधील निवडणुकीचा कल दाखवणारा एक ओपिनियन पोल समोर आला असून, त्यामधून यापैकी काही राज्यांमध्ये निवडणुकीची हवा बदलताना दिसत आहे.

MATRIZE ने केलेला हा ओपिनियन पोल इंडिया टीव्हीने प्रसिद्ध केला असून, या पोलमधून केरळ, तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये अटीतटीच्या लढतीचे संकेत मिळत आहेत. तर आसाममध्ये भाजपाचं पारडं जड दिसत आहे.

या ओपिनियन पोलमधील अंदाजानुसार आसाममध्ये पुन्हा एकदा भाजपाची सत्ता येण्याची शक्यता आहे. आसाममधील विधानसभेच्या १२६ जागांपैकी ९२ ते १०२ जागांवर भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए बाजी मारण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला २२ ते ३२ जागा मिळू शकतात. तसेच इतर पक्षांना ४ ते ७ जागा मिळण्याची शक्यता आहे.

तर दक्षिणेतील राज्य असलेल्या केरळमध्ये यावेळी अटीतटीची लढत होण्याचे संकेत ओपिनियन पोलमधून मिळत आहेत. राज्यातील विधानसभेच्या १४० जागांपैकी ६२ ते ६८ जागा सत्ताधारी एलडीएफला मिळू शकतात. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला ६७ ते ७३ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एनडीएला ५ ते ८ जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तसेच इतरांच्या खात्यात ० ते ३ जागा जाऊ शकतात. एकूणच केरळमध्ये सत्ताधारी एलडीएफ आणि विरोधी पक्ष असलेल्या यूडीएफमध्ये चुरशीची लढत होऊ शकते. मात्र त्यात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफला किंचित आघाडी असल्याचं दिसत आहे.

केरळप्रमाणेच तामिळनाडूमध्येही अटीतटीची लढत होण्याचा अंदाज ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आला आहे. तामिळनाडूमध्ये डीएमके आणि एआयएडीएमके या पक्षांच्या आघाड्यांमध्ये मुख्य लढत होत आहे. तर अभिनेता विजय याच्या टीव्हीके पक्षाच्या रूपात तिसरा पर्यांय मैदानात आहे. ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांपैकी १०७ ते १२० जागा भाजपा आणि एआयएडीएमकेच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळण्याची शक्यता आहे. तर सध्याच्या सत्ताधारी असलेल्या डीएमकेच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला १०२ ते ११५ जागा मिळण्याची शक्यता आहे. अभिनेता विजयच्या टीव्हीके पक्षाला ५ ते १२ तर इतर पक्षांना १ ते ६ जागा मिळण्याची शक्यता आहे.

तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालमध्ये यावेळी मोठी उलथापालथ होऊन सत्तांतर होण्याची शक्यता या ओपिनियन पोलमधून वर्तवण्यात आली आहे. ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार राज्यातील २९४ जागांपैकी १४० ते १६० जागा तृणमूल काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपाला १३० ते १५० जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इतरांना ८ ते १६ जागा मिळू शकतात.

















