Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांची अमित शहांसोबत दिल्लीत चर्चा, विठ्ठल-रखुमाईची मूर्ती भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2022 22:57 IST2022-07-08T22:42:36+5:302022-07-08T22:57:42+5:30
राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची औपचारीक भेट घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीत दाखल झालं आहे. त्यामुळे, या भेटीतही तीच चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर सोमवारी शिंदे-फडणवीस सरकारने विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला.
त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाण्यात जोरदार स्वागत झाले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही नागपूरमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले.
शिवसेनेचे इतरही बंडखोर आमदार त्यांच्या मतदारसंघात गेले. त्यानंतर, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आता मुंबईत परतले असून आजच ते दिल्लीत पोहोचले आहेत.
शिंदे-फडणवीस जोडीने बैठकांचा धडाका लावला असून आज सायंकाळी ते राजधानी दिल्लीत पोहोचले आहेत. देवेंद्र फडणवीसांनीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन फोटो शेअर करत यासंदर्भात माहिती दिली.
त्यानंतर, आता दोन्ही नेत्यांनी दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. अमित शहांची भेट घेतल्याचे फोटो सध्या सोशल मीडियातून समोर आले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती अमित शाहांना भेट देण्यात आली आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती नाही.
राज्य मंत्रिमंडळ विस्तार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची औपचारीक भेट घेण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार दिल्लीत दाखल झालं आहे. त्यामुळे, या भेटीतही तीच चर्चा झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
मुख्यमंत्री उद्या शनिवार (9 जुलै) रोजी त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसमवेत भेट होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत. नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत या भेटीत मुख्यत्वे चर्चा होणार असल्याचे समजते.