संतापजनक! प्रसुतीचे बिल देता आले नाही म्हणून डॉक्टराने नवजात बाळाचा केला सौदा

By बाळकृष्ण परब | Published: October 1, 2020 05:25 PM2020-10-01T17:25:29+5:302020-10-01T17:38:58+5:30

डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेच्या गरिबीचा फायदा उठवत तिच्याकडील नवजात बाळाला डॉक्टराने अवघ्या तीन हजार रुपयांना खरेदी केल्याचे समोर आले आहे.

रुग्णसेवेसी संबंधित असल्याने डॉक्टरी पेशा हा पवित्र समजला जातो. मात्र या डॉक्टरी पेशाला कलंक लावणारी एक घटना बिहारमधे घडली आहे.

डिलिव्हरीसाठी आलेल्या महिलेच्या गरिबीचा फायदा उठवत तिच्याकडील नवजात बाळाला डॉक्टराने अवघ्या तीन हजार रुपयांना खरेदी केल्याचे समोर आले आहे. तसेच या व्यवहाराचा पुरावा म्हणून पीडित महिलेचा कागदावर अंगठाही घेतला आहे. हा प्रकार खगडिया जिल्ह्यातील मैड्या ठाणे परिसरात घडला.

येथील देवरी परिसरात राहणारे चंडिका सिंह आपल्या पत्नीला प्रसुतीसाठी पीएसची येथे घेऊन जात होते. तेव्हा एका दलालाने त्यांना न्यू महिला क्लिनिक येथे नेले. मात्र तिथे जात असताना वाटेतच महिलेची डिलिव्हरी झाली. तर दुसऱ्या मुलाचा जन्म हा क्लीनिकमध्ये पोहोचल्यानंतर झाला.

प्रसुती झाल्यानंतर महिला डॉक्टर एन. बानो हिने प्रसुती शुल्क म्हणून ७ हजार रुपयांची मागणी केली. मात्र सदर महिला ही खूप गरीब असल्याने तिला डिलिव्हरीसाठी एवढ्या रकमेची तातडीने जुळवाजुळव करणे शक्य नव्हते. तेव्हा या महिला डॉक्टरने एका मुलाची किंमत १० हजार रुपये एवढी करत प्रसूत महिलेला तीन हजार रुपये देऊन एका कागदावर अंगठा उमटवून घेतला आणि मुलाला स्वत:कडे ठेवून घेतले.

दुसऱ्या दिवशी सदर महिला आपल्या पतीसह काही नातेवाईकांना घेऊन तक्रा देण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचली तिथे पोलिसांनी तिची तक्रार ऐकून घेण्यास नकार दिला. मात्र प्रकरण अधिक वाढल्यावर संबंधित महिला डॉक्टरने मूल सदर दाम्पत्याला परत केले.

या प्रकाराबाबत स्पष्टीकरण देताना महिला डॉक्टर एम. बाने हिने सांगितले की, नवजात मुलाची दयनीय परिस्थिती पाहून मी हे पाऊल उचलले. तसेच आपण दहा हजार रुपयांमध्ये मुलाचा व्यवहार केला. मात्र या नवजात मुलाला वाचवणे हाच माझा यामागचा हेतू होता, असा दावाही या महिला डॉक्टरने केला.