Covishield Vaccine: कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी महत्त्वाची बातमी! १६% व्यक्तींमध्ये तयार झाल्याच नाहीत अँटिबॉडी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 04:11 PM2021-07-04T16:11:26+5:302021-07-04T16:16:03+5:30

कोविशील्ड लस घेतलेल्यांची चिंता वाढली

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद व्हायची. आता हाच आकडा ५० हजारांच्या खाली आला आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरण अभियानाला वेग देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. देशात लसीकरणासाठी प्रामुख्यानं कोविशील्ड आणि कोवॅक्सिनचा वापर होत आहे.

सीरमची उत्पादन क्षमता जास्त असल्यानं देशात बहुतांश ठिकाणी कोविशील्डचा वापर केला जात आहे. मात्र काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) संशोधनामुळे कोविशील्ड घेतलेल्यांची चिंता वाढली आहे.

कोविशील्डचे दोन्ही डोस घेतलेल्या व्यक्तींपैकी १६.१ टक्के लोकांमध्ये डेल्टा व्हेरिएंटविरोधात अँटिबॉडी तयार न झाल्याचं संशोधन सांगतं. तर एक डोस घेतलेल्यांपैकी ५८.१ टक्के लोकांमध्ये अँटिबॉडी आढळून आलेल्या नाहीत.

अँटिबॉडी दिसून/आढळून न येणं आणि अँटिबॉडी तयार न होणं या दोन्ही बाबी वेगवेगळ्या असल्याचं वेल्लोरस्थित ख्रिश्चियन वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाचे माजी प्रमुख डॉ. जेकब जॉन यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितलं.

'कोविशील्डची लस घेतलेल्यांमध्ये अँटिबॉडीज तयार झाल्या असाव्यात. मात्र त्यांचं प्रमाण कमी असल्यानं त्या डिटेक्ट झाल्या नसाव्यात. संबंधित व्यक्तीचा कोरोनापासून बचाव करू शकतील इतक्या अँटिबॉडीज त्याच्या शरीरात असू शकतात,' असं जॉन म्हणाले.

'६५ वर्षांवरील व्यक्तींना मधुमेह, हायपरटेंशन, किडनी, हृदयासंबंधित अनेक गंभीर आजार असतात. त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते. अशा व्यक्तींना तिसरा डोस देण्याची गरज आहे,' असं जॉन यांनी सांगितलं.

दोन्ही डोस घेतल्यानंतरही अँटिबॉडीज तयार होत नसतील, तर भारतात काही व्यक्तींना बूस्टर डोसची गरज असल्याचं आयसीएमआरच्या अभ्यासातून अधोरेखित झालं आहे. पण कोरोनातून बऱ्या झालेल्यांना केवळ एकच डोस पुरेसा आहे, असं जॉन म्हणाले.

Read in English