हा आहे देशातील सर्वात रुंद एक्स्प्रेस वे, ६-८ नाही तर आहेत १४ लेन, सायकल घेऊनही करू शकता प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 01:59 PM2023-03-18T13:59:17+5:302023-03-18T14:09:26+5:30

Delhi Meerut Expressway: देशात सध्या दळणवळण आणि वाहतुकीच्या सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी एक्स्प्रेस वे बांधण्याचं काम वेगाने सुरू आहे. देशातील सर्वात लांब एक्स्प्रेस वे मुंबई आणि दिल्लीदरम्यान बांधण्यात येत आहे. मात्र देशातील सर्वात रुंद एक्स्प्रेस वे कुठला आहे याची माहिती तुम्हाला आहे का?

देशात सध्या दळणवळण आणि वाहतुकीच्या सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात यासाठी एक्स्प्रेस वे बांधण्याचं काम वेगाने सुरू आहे. देशातील सर्वात लांब एक्स्प्रेस वे मुंबई आणि दिल्लीदरम्यान बांधण्यात येत आहे. मात्र देशातील सर्वात रुंद एक्स्प्रेस वे कुठला आहे याची माहिती तुम्हाला आहे का?

दिल्ली-मेरठ एक्स्प्रेस वे हा देशातील सर्वात रुंद एक्सप्रेस वे आहे. यामध्ये एकूण १४ लेन आहेत. यातील मध्यभागी ६ एक्स्प्रेस लेन आहेत. तर त्याच्या दोन्ही बाजूला प्रत्येकी ४-४ लोकल लेन आहेत. त्यामाध्यमातून स्थानिक वाहतूक सांभाळली जाते.

या एक्स्प्रेस वे च्या कामाला २००६ मध्ये मान्यता मिळाली होती. तर २०२१ मध्ये तो बांधून पूर्ण करण्यात आला. या आधी मेरठहून दिल्लीला जाण्यासाठी अडीच तास लागायचे. मात्र आता ही वेळ केवळ ४५ मिनिटांवर आली आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथून या एक्स्प्रेस वे ची सुरुवात होते. एक्स्प्रेस वे मुळे दिल्लीतून हरिद्वार आणि देडराडूनला जाण्याचा प्रवासही सुखकर बनला आहे.

या एक्स्प्रेस वे ची काही खास वैशिष्ट्ये आहेत. या एक्स्प्रेस वेवर एकही सिग्नल नाही आहे. याच्या दोन्ही बाजूला गार्डन विकसित करण्यात आले आहेत. त्यावर कुतुब मिनार आणि अशोक स्तंभाची स्मारक चिन्हे आहेत.

या एक्स्प्रेसवे चं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही त्यावरून सायकल घेऊनही जाऊ शकता. कारण याच्या दोन्ही बाजूला सायकल ट्रॅक देण्यात आले आहेत. तसेच या मार्गावर लावलेले दिवे हे सोलर एनर्जीद्वारे प्रकाशित होतात. त्यामुळे विजेची खूप बचत होते.

या एक्स्प्रेसवेवर २४ लहान मोठे पूल, १० फ्लायओव्हर, ३ रेल्वे पूल, ९५ अंडरपास आणि १५ भूमिगत पादचारी मार्ग आहेत. या संपूर्ण महामार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.

हा देशातील पहिला महामार्ग किंवा एक्स्प्रेस वे आहे ज्यावर ऑटोमेटिक नंबर प्लेट रीडर तंत्राचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे इथे टोल भरण्यासाठी वाहनांना थांबावं लागत नाही.