प्रभू रामाची नगरी २२ लाख दिव्यांनी उजळली; डोळे दिपवणारा दीपोत्सव, पाहा PHOTO

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 07:56 PM2023-11-11T19:56:15+5:302023-11-11T19:59:59+5:30

अयोध्येत आयोजित भव्य 'दीपोत्सव-२०२३' मध्ये शनिवारी २२ लाख २३ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले. यासोबतच एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवे लावण्याचा नवा रेकॉर्डही करण्यात आला आहे. यावेळी अयोध्येत ग्रीन फटाके फोडण्यात आले आणि आकाश लेझर दिव्यांनी उजळून निघाले.

दरवर्षी दिवाळीत अयोध्येतील रामभक्त दीपोत्सवाची वाट पाहतात. कारण अयोध्येने वर्षानुवर्षे या दिवसाची वाट पाहिली आहे. रामनगरीचे सौंदर्य फुलून निघाले आहे. दीपोत्सवानिमित्त राज्यपाल आनंदी बेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

अयोध्येत यंदा २२ लाख २३ हजार दिवे लावण्याचा नवा विक्रम झाला आहे. यापूर्वीचा विक्रम १८ लाख ८१ हजार दिव्यांचा होता. ड्रोन कॅमेरा वापरून या दिव्यांची मोजणी करण्यात आली आहे. दीपोत्सव कार्यक्रमात लेझर शोच्या माध्यमातून रामलीला दाखवण्यात आली.

सीएम योगींनी सरयू नदीची आरती केली. त्याचबरोबर रामाच्या पाड्यावर लाखो दिवे प्रज्वलित करण्यात आले आहेत. विविध घाटांवर 24 लाखांहून अधिक दिवे लावण्यात आले आहेत. राम की पौरीवर लाखो दिवे लावून नवा विश्वविक्रम करण्याची तयारी सुरू आहे. लेझर शोही होणार आहे.

या दीपोत्सवाची तयारी खूप दिवसांपासून सुरू होती. यात हजारो स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या मदतीनेच हा दीपोत्सव साजरा करण्यात आला. जवळपास मागील १ आठवड्यांपासून सरयू घाटावर दीपोत्सवाची तयारी चालली होती.

दीपोत्सवाला अयोध्येला दिव्यांनी सजवलेले जाते, प्रथेनुसार, प्रभू राम १४ वर्षांच्या वनवासानंतर जेव्हा अयोध्येत परतले होते तेव्हा अयोध्या वासियांनी श्रीराम आणि सीतामातेचे स्वागत दिवे लावून केले होते, तेव्हापासून दिवाळीची परंपरा सुरू झाली आहे.

२०१७ मध्ये योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री बनले, तेव्हापासून रामनगरीत पहिल्यांदा दिपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी अयोध्येच्या सरयू घाटावर १ लाख ८७ हजार दिवे लावले होते. त्यानंतर दरवर्षी हा कार्यक्रम नित्यनियमाने साजरा होतो.

२०१८ मध्ये दीपोत्सवात अयोध्येत ३ लाख ११ हजार दिवे लावले होते. त्यानंतर २०१९ मध्ये ४ लाख १० हजार, अयोध्येत दरवर्षी दिव्यांची संख्या लाखोंनी वाढत आहे. त्यामुळे अयोध्या दिवाळीत उजळून निघते, हा दीपोत्सव पाहण्यासाठी हजारो लोक अयोध्येत येतात.

२०२० मध्ये अयोध्येच्या सरयू घाटावर साडे सहा लाख आणि २०२१ मध्ये जवळपास ९ लाख ४१ हजार दिवे लावले होते. तर २०२२ मध्ये हा आकडा १८ लाख ८१ हजार दिवे प्रज्वलित करण्यात आले होते. तर यंदा नवा विक्रम नोंदवण्यात आला आहे

अयोध्येत भव्य दीपोत्सवाच्या आधी मर्यादापुरुषोत्तम श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण यांचा रथ काढण्यात आला. यावेळी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते सरयू घाटावर आरती करण्यात आली.