Corona Vaccination: मोठ्ठा दिलासा! कोविशील्ड लस घेतलेल्यांसाठी पॉझिटिव्ह बातमी; भारतीयांचं टेन्शन दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2021 09:02 AM2021-07-28T09:02:05+5:302021-07-28T09:06:36+5:30

Corona Vaccination: एएफएमएसच्या अहवालातून महत्त्वाची माहिती समोर

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाख कोरोना रुग्ण आढळून येत होते. आता हाच आकडा ४० हजारांच्या खाली आला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं घट होत आहे. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. हा धोका टाळण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज आहे.

कोरोना लसीकरण मोहिमेत भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन आणि सीरमच्या कोविशील्डचा सर्वाधिक वापर होत आहे. सीरमची उत्पादन क्षमता खूप मोठी असल्यानं बहुतांश नागरिकांना कोविशील्ड लस मिळाली आहे. त्यातच आता कोविशील्ड लसीबद्दल एक दिलासादायक माहिती सरकारनं दिली आहे.

कोविशील्ड लस कोरोना महामारीविरोधात ९३ टक्के सुरक्षा देते आणि यामुळे मृत्यूदर ९८ टक्क्यांनी घटतो अशी माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्याचं आवाहन त्यांनी केलं.

कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटमुळे देशात कोरोनाची दुसरी लाट आली होती, असं नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं. याबद्दल सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयानं (एएफएमसी) अहवाल तयार केल्याची माहिती पॉल यांनी दिली.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत अग्रस्थानी राहून लढणारे १५ लाख डॉक्टर्स आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्या आरोग्याचा अभ्यास करून एएफएमसीनं अहवाल तयार केला. कोविशील्डची लस घेतलेल्या ९३ टक्के लोकांना दुसऱ्या लाटेत विषाणूपासून संरक्षण मिळालं, असं हा अहवाल सांगतो.

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर संक्रमणाचा धोका कमी होतो. मात्र याची संपूर्ण खात्री देता येत नाही. दुसरी लाट आली असताना कोविशील्डमुळे मृत्यूदर ९८ टक्क्यांनी कमी झाला, असंदेखील एएफएमसीच्या अहवासाल नमूद करण्यात आलं आहे.

कोरोनाची लागण होणारच नाही अशी खात्री कोणतीच लस घेतल्यानंतर देता येत नाही. मात्र लस घेतल्यामुळे गंभीर परिस्थिती टाळता येते, असं व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.

आपल्याकडे असलेल्या लसींवर विश्वास ठेवा. लसीकरण करून घ्या आणि लस घेतल्यावर सतर्क राहा. बेजबाबदारपणे वागू नका, असं आवाहन पॉल यांनी नागरिकांना केलं.