coronavirus: चिंताजनक, कोरोनाने शरीरात लपण्यासाठी शोधली नवी जागा, RT-PCR चाचणीमधूनही थांगपत्ता लागेना

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 09:18 AM2021-04-14T09:18:17+5:302021-04-14T09:28:41+5:30

coronavirus update : भारतामध्ये कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. सध्या कोरोनाच्या ज्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वाढत आहे तो आधीच्या विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. चिंताजनक बाब म्हणजे अनेक रुग्णांमध्ये आरटी-पीसीआर चाचणीमधूनही या विषाणूचा थांगपत्ता लागत नाही आहे.

भारतामध्ये कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. सध्या कोरोनाच्या ज्या व्हेरिएंटमुळे रुग्णसंख्या वाढत आहे तो आधीच्या विषाणूपेक्षा अधिक संसर्गजन्य आहे. चिंताजनक बाब म्हणजे अनेक रुग्णांमध्ये आरटी-पीसीआर चाचणीमधूनही या विषाणूचा थांगपत्ता लागत नाही आहे. कोरोनाच्या संसर्गाचा शोध घेण्यासाठी आरटी-पीसीआर चाचणी ही बऱ्यापैकी विश्वासार्ह मानली जाते.

दिल्लीतील काही रुग्णालयांमध्ये अनेक असे रुग्ण सापडत आहेत ज्यांच्यामध्ये कोरोनाची लक्षणे दिसत आहेत, मात्र कोरोनाची चाचणी केली असता ते निगेटिव्ह येत आहे. अनेकदा दोन-तीन चाचण्यांनंतरही परिणाम निगेटिव्ह येत आहे.

याबाबत डॉ. आशिष चौधरी यांनी सांगितले की, आमच्याकडे गेल्या काही दिवसांपासून असे अनेक रुग्ण आले आहेत. त्यांना ताप येत होता. श्वास घेण्यात त्रास होत होता. त्यांच्या फुप्फुसांचे सिटी-स्कॅन केले असता फिकट करड्या रंगाचा डाग दिसून येत होता. कोरोनाचे हे मोठे लक्षण आहे.

अशा काही रुग्णांच्या तोंडातून किंवा नाकामधून एक यंत्र फुप्फुसांपर्यंत सोडण्यात आले आणि तेथील फ्लुएड एकत्र करून तपास करण्यात आला. तेव्हा असे रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले. या प्रक्रियेला ब्राँन्कोलवेलार लेव्हेज म्हणतात. कोरोनाच्या प्रचलित चाचणीत निगेटिव्ह आलेले रुग्ण या प्रक्रियेमधून पॉझिटिव्ह आले, असे डॉ. चौधरी यांनी सांगितले.

इंस्टिट्युट ऑफ लिव्हर अँड बायलरी सायन्सेसमधील क्लिनिकल मायक्रोबायोलॉजी विभागाच्या असोसिएट्स प्रोफेसर डॉ. प्रतिभा काळे यांनी सांगितलं की, कोरोना विषाणूने नाक किंवा घशात वास्तव्य केले नसल्याने स्वॅब सॅम्पलमधून त्याचे निदान होत नसल्याची शक्यता आहे. या विषाणूने एस रिसिप्टर्समध्ये जागा बनवली असावी. हा एस रिसिप्टर्स असे प्रोटिन असतात जे फुप्फुस आणि पेशींमध्ये सापडतो. त्यामुळे जेव्हा फ्लुएड सँम्पलची तपासणी होते तेव्हाच कोरोना विषाणूच्या संसर्गाचे निदान होत आहे.

मॅक्स हेल्थकेअरच्या पल्मोनोलॉजी डिव्हिजनचे प्रमुख डॉ. विवेक नांगिया यांनी सांगितले की, सुमारे १५-२० टक्के रुग्णांना या समस्येचा सामना करावा लागत आहे. काही रुग्णांत कोरोनाची लक्षणे दिसून येतात. मात्र त्यांची चाचणी निगेटिव्ह येते. असे रुग्ण कोविड रुग्णालयांऐवजी खासगी रुग्णालयात भरती होतात. त्यामुळे आजाराचा संसर्ग होण्याचा धोका अधिकच वाढतो. तसेच इलाजामधूनसुद्धा संसर्गाची माहिती मिळत नसल्याने उपचारांमध्येसुद्धा उशीर होत आहे. गेल्यावेळच्या तुलनेत रुग्णांमधील लक्षणांमध्येही बदल दिसून येत आहे. त्यामुळे कोरोना विषाणूमध्ये म्युटेशन झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर गंगाराम रुग्णालयाचे सिनियर कन्सल्टन्ट डॉ. अरुप बासू यांनी सांगितले की, यावेळी सर्दी, खोकला, नाक गळणे आणि कंजक्टिवाइटिसची लक्षणे रुग्णांमध्ये दिसत आहेत. ही लक्षणे आधी दिसत नव्हती. अनेक रुग्णांना कफ, श्वास घेण्यास अडथळे वगैरे लक्,णे दिसत नाही आहेत. काहींच्या फुप्फुसाचे सिटीस्कॉनही नॉर्मल येत आहे. मात्र ८-९ दिवसांपर्यंत सातत्याने ताप येतो. त्यामुळे रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.