उद्यापासून ४५ वर्षांवरील व्यक्तींनाही मिळणार कोरोना लस; मात्र 'या' गोष्टी बंधनकारक

By देवेश फडके | Published: February 28, 2021 01:57 PM2021-02-28T13:57:46+5:302021-02-28T14:02:25+5:30

कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्च २०२१ पासून सुरू करण्यात येत आहे. कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस मोफत देण्यात येईल, असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील मात्र गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे. (Coronavirus Vaccine)

नवी दिल्ली : कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञांनी अविरत मेहनत घेऊन कोरोना लस शोधून काढली. भारताने सीरम इन्स्टिट्यूटच्या कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली. (Coronavirus Vaccine)

कोरोना लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर देशव्यापी कोरोना लसीकरण अभियान केंद्र सरकारकडून सुरू करण्यात आले. या कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा ०१ मार्च २०२१ पासून सुरू करण्यात येत आहे.

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील व्यक्तींना कोरोना लस मोफत देण्यात येईल, असे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर ४५ वर्षांवरील मात्र गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून शनिवारी आजारांची यादी जारी करण्यात आली. या यादीत समाविष्ट करण्यात आलेले आजार ४५ ते ५९ वर्षांदरम्यान असलेल्या व्यक्तींना असतील, तर त्यांना कोरोना लस देण्यात येणार आहे.

आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या यादीत २० गंभीर आजारांचा समावेश करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये मधुमेह, हायपर टेंशन, किडनी, लिव्हर, ल्युकेमिया, एचआयव्ही, बोन मेरो फेलियर आणि हार्ट फेलियर यांसारख्या २० गंभीर आजारांचा या यादीत समावेश आहे.

या यादीत कर्करोगाचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र, ४५ ते ५९ या वयोगटातील व्यक्तींना कोरोना लसीकरणापूर्वी काही गोष्टी बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या गोष्टींची पूर्तता केल्यावरच ४५ ते ५९ या वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस देण्यात येणार आहे.

४५ ते ५९ या वयोगटातील व्यक्तींना कोरोना लस घेण्यापूर्वी ओळखपत्र, स्वाक्षरीकृत वैद्यकीय प्रमाणपत्र यांसारखी कागदपत्रे सादर करणे बंधनकारक असल्याचे सांगितले जात आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र नोंदणीकृत डॉक्टरांकडूनच स्वाक्षरीकृत करून घ्यावे लागणार आहे.

कोरोना लसीकरणाला बळकटी देण्यासाठी केंद्र सरकारने १० हजार खासगी रुग्णालयांची निवड केली आहे. आयुष्यमान भारत योजनेत महाराष्ट्रातील ६५९ तर केंद्र सरकारने आरोग्य योजनेअंतर्गत ११६ खासगी रुग्णालयांना कोरोना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे.

खासगी रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी एका डोससाठी २५० रुपये खर्च येणार आहे. कोविन अ‌ॅपद्वारे ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. पंतप्रधान आयुष्मान भारत जनआरोग्य योजना, महात्मा फुले आरोग्य योजना अशा शासकीय योजनांचे लाभ देणाऱ्या रुग्णालयांमध्येच ही लस उपलब्ध होणार आहे.

कोरोना लसीसाठी रुग्णालयांना २५० रुपये दर आकारण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र यातील १५० रुपये रुग्णालयांना शासनाकडे भरावे लागणार आहेत. मुंबईतील ३१, नागपूरमधील ४५ तर पुणेमधील ४० रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे.