coronavirus: भारतात वृद्धांपेक्षा तरुणांमध्येच दिसून आला कोरोनाचा कहर, समोर आली धक्कादायक आकडेवारी

By बाळकृष्ण परब | Published: October 6, 2020 04:49 PM2020-10-06T16:49:35+5:302020-10-06T17:08:40+5:30

coronavirus In India News: भारतातील विविध वयोगटातील व्यक्तींवर झालेल्या कोरोनाच्या संसर्गाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

देशातील कोरोनाच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसांपासून कमी होऊ लागला आहे. तसेच अनलॉकिंगच्या प्रक्रियेंतर्गत देशातील अनेक उद्योग व्यवहार आता हळूहळू सुरू करण्यात येत आहेत. दरम्यान, कोरोनाच्या भारतातील विविध वयोगटातील व्यक्तींवर झालेल्या संसर्गाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोरोना विषाणू हा सामान्यपणे ६०-६५ वर्षांवरील लोकांसाठी अधिक धोकादायक मानला जात आहे. मात्र समोर आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल कराव्या लागलेल्या दर दहा रुग्णांपैकी ६ रुग्ण (६२.५ टक्के) हे ४० वर्षांच्या आतील असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रायलाने सर्व्हिलान्स प्रोग्रॅमअंतर्गत कोरोनामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोन लाख रुग्णांच्या केलेल्या विश्लेषणामधून ही माहिती समोर आली आहे.

हे निष्कर्ष भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कलांशी अनुरूप असे आहेत. यामध्ये अपेक्षेनुसार संसर्ग झालेल्यांमध्ये तरुणांचे प्रमाण अधिक आहे. मात्र मृतांमध्ये वृद्धांचे प्रमाण अधिक आहे.

भारतात कोरोनामुळे आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. यामधील ५३ टक्के व्यक्तींचे वय हे ६० वर्षांहून अधिक होते. तर ८८ टक्के रुग्णांचे वय हे ४५ वर्षांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, कोरोनामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांच्या वयानुसार संसर्ग झालेल्यांची संख्या प्रथमच सांगितली आहे. या अहवालानुसार रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांमध्ये ६० वर्षांवरील व्यक्तींचे प्रमाण हे ९ टक्के आहे. तर २१ ते ३० वर्षांमधील रुग्णांचे प्रमाण हे २५.८४ टक्के आणि ३१ ते ४० वर्षांमधील रुग्णांचे प्रमाण २२.४८ टक्के आहे. तर ९० वर्षांवरील केवळ ०.०९ टक्के रुग्णांनाच रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

वृद्धांना आणि आजारी असलेल्याना कोरोनाचा धोका विचारात घेऊन आरोग्य यंत्रणेने ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती अशा हाय रिस्क झोनमधील व्यक्तींवर नजर ठेवली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी नाव न सांगण्याचा अटीवर सांगितले की, भारतामध्ये दिसत असलेला हा पॅटर्न बाहेरील तज्ज्ञांकडून मिळणाऱ्या डेटाशी मिळताजुळता आहे. ज्यामध्ये हा विषाणू मुलांच्या तुलनेत वयस्कर व्यक्तींसाठी अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. वयस्कर आणि गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या व्यक्तींसाठी हा विषाणू जीवघेणा आहे.

रिपोर्टनुसार, कोरोनामुळे मरणाऱ्या ७० टक्के व्यक्तींमध्ये हायपरटेंशन, डायबिटिस, कार्डिएक अरेस्ट, यकृत आणि मुत्रपिंडविकार यासारख्या आजार होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुळे ज्या व्यक्तींचा मृत्यू झाला अशा व्यक्तींपैकी बहुतांश रुग्णांना एकापेक्षा अधिक आजार होते. त्यामुळे असे आजार असणाऱ्यांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

नवी दिल्लीमधील एम्सचे डॉक्टर एनके मेहरा सांगतात की, कोरोना हा अत्यंत संसर्गजन्य विषाणू आहे. त्यामुळे अनेकजण बाधित होत आहेत. मात्र या विषाणूमुळे भारतात फार कमी नुकसान झाले आहे. भारतातील मृत्यूदरसुद्धा कमी आहे. त्याच सर्वात मोठं कारण म्हणजे युरोप किंवा अमेरिकेत राहणाऱ्या व्यक्तींच्या तुलनेत भारतीय व्यक्तींची रोगप्रतिकारक्षमता अधिक आहे.