CoronaVirus News : बापरे! लस घेण्यास उशीर केल्यास कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा धोका आणखी वाढणार; तज्ज्ञांचा गंभीर इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 18:42 IST2021-04-29T18:26:58+5:302021-04-29T18:42:11+5:30
CoronaVirus Marathi News and Live Updates : देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

कोरोनामुळे देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून दररोज कोरोनाचे तब्बल तीन लाखांहून अधिक नवीन रुग्ण आढळून येत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे काही ठिकाणी भयावह स्थिती आहे.
देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,83,76,524 वर पोहोचला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 2,04,832 लोकांना आपली जीव गमवावा लागला आहे.
देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,79,257 नवे रुग्ण आढळले आहेत तर 3645 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय केले जात असून योग्य ती काळजी घेतली जात आहे.
देशात लसीकरण मोहीम वेगाने सुरू असून आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. याच दरम्यान लसीकरण आणि कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटसंदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरूच आहे. काही शहरांमध्ये संसर्गाचा वेग काहीसा कमी झाला आहे, तर काही भागात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र अद्यापही स्थिती नियंत्रणात आहे असं म्हणता येणार नाही.
आरोग्य तज्ज्ञांच्या दिलेल्या माहितीनुसार, जर लोकांनी कोरोना लस घेण्यास उशीर केला तर कोरोना व्हायरच्या नव्या व्हेरियंटमध्ये म्युटेट होण्याची संधी मिळेल. कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
केंद्र सरकारने 1 मेपासून देशातील 18 वर्षे वयावरील सर्वांना लस देण्यास परवानगी दिल्यानंतर ही चिंता तज्ज्ञांना जाणवू लागली आहे. जे लोक लस घेत नाहीत, ते स्वतःवर आणि दुसऱ्या व्यक्तींवर अन्याय करीत आहेत असं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
कोरोना विरुद्धच्या या लढाईला आरपारची लढाई समजून लढावे लागणार आहे. या महाभयंकर संकटाला देशाबाहेर पिटाळण्याचा लस हा एकमेव मार्ग आहे. मात्र प्रत्येक तरुण आणि ज्येष्ठ नागरिक लस घेण्यात संकोच करणार नाही तोपर्यंत हे शक्य नाही.
ग्लेनाईगल्स ग्लोबल हॉस्पिटलचे क्लस्टर सीओओ डॉ. मर्विन लियो यांनी दिलेल्या माहितीनुसार,कोविड-19 विषाणू हा अनेक लोकांमध्ये आहे आणि तेथून त्याचा प्रसार होऊ शकतो. मात्र त्याचवेळी त्याच्याकडे नवीन व्हेरियंट विकसित करण्याची संधी देखील आहे. यातील काही व्हेरियंट लसीचा प्रभाव कमी करू शकतात.
लसीकरणाला वेग देणं हे सोपं काम नाही. नोंदणी करणाऱ्यांची संख्या पहिल्याच दिवशी 1 कोटींवर पोहोचली आहे. त्यात नोंदणीसाठी अजून 2 दिवस बाकी आहेत. सरकार आव्हान स्वीकारत हे काम करीत आहे, ही बाब उल्लेखनीय म्हणता येईल. कोरोनाविरुद्धच्या लढाईत लसीकरण हे निर्णायक पाऊल ठरणार असल्याचं तज्ज्ञ सांगतात.
कॉन्टिनेंटल हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. रियाज खान यांनी या साथीच्या काळात सर्व लोकांना हर्ड इम्युनिटीच्या स्तरावर आणणं हा लसीकरणाचा मुख्य उद्देश आहे. जोपर्यंत सर्व नागरिक या अभियानात आपला सहभाग नोंदवत लस घेत नाहीत,तोपर्यंत हे शक्य नाही. कोरोना विरुध्दच्या या लढाई सामुदायिक प्रयत्न गरजेचे आहेत असं म्हटलं आहे.
एसएलजी हॉस्पिटलमधील इंटरनल मेडिसिन विभागाच्या सल्लागार डॉ. आरती बेल्लारी यांनी सांगितले की कोविशिल्ड असो वा कोवॅक्सिन, लसीकरणावर भर देणं आवश्यक आहे. जी लस सहज उपलब्ध होईल ती तातडीनं घेणं गरजेचं आहे.
दोन्ही लसींचे परिणाम सिद्ध झाले असून, एक डोस घेतला तरी त्यामुळे पुरेशी सुरक्षा मिळू शकेल. लोकांनी लस घेण्याकरिता वर्षभर थांबण्यात काही अर्थ नाही. लोक जितकी ही गोष्ट टाळतील तितका विषाणूचा व्हेरियंट म्युटेट होण्याचा धोका वाढेल असं म्हटलं आहे.
अमेरिकेतील डोजसिटी येथील वेस्टर्न प्लेन्स हॉस्पिटलच्या डॉ. अनुषा कारा यांनी कोरोना लस तातडीने घेण्यावर भर दिला पाहिजे असं म्हटलं आहे. शास्त्रज्ञांकडे इतका डेटा जमा झाला आहे की आता लोकांनी लस आणि वैद्यकीय विश्वावर विश्वास ठेवला पाहिजे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
देशात मे महिन्याच्या मध्यावधीत दररोज 5 हजारांहून अधिक मृत्यू होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन हजारांहून अधिक करोना मृत्यूची नोंद होत असताना संशोधनातून ही माहिती आता समोर आली आहे.
वॉशिंग्टन विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्युशनने ((IHME) चिंता वाढवणारा इशारा दिला आहे. कोरोनामुळे भारतातील परिस्थिती पुढील काही आठवड्यात आणखी वाईट होईल असं म्हटलं आहे.
तज्ज्ञांनी भारतातील सध्याचा संसर्गाची आणि मृत्यू सरासरी यांचाही अभ्यास केला आहे. रिपोर्टनुसार, भारतात कोरोना मृतांची संख्या शिखरावर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच गंभीर परिस्थितीचा इशारा देण्यात आला आहे.
10 मे रोजी भारतात 5 हजार 600 जणांचा कोरोनामुळे मृत्यूची होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच 12 एप्रिल ते 1 ऑगस्ट या कालावधीत देशात 3 लाख 29 हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो असा दावा रिसर्चमधून करण्यात आला आहे.