CoronaVirus News : लॉकडाऊननंतर शाळेमध्ये शिकवण्याच्या पद्धतीत होऊ शकतात 'हे' बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 02:28 PM2020-06-01T14:28:36+5:302020-06-01T14:53:39+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊन उघडल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काही बदल होऊ शकतात. कोणत्या पद्धती अवलंबल्या जाऊ शकतात याबद्दल जाणून घेऊया.

कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून कोरोना रुग्णांचा आकडा हा तब्बल 1,51,767 वर गेला आहे.

वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन सुरू आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काही दिवसांपासून 15 जूनपर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू होणार अशी चर्चा सुरू होती.

शाळा-महाविद्यालये कधी सुरू होणार? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत आता एक स्पष्टीकरण दिलं आहे.

देशभरातील शाळा, महाविद्यालय तसेच शैक्षणिक संस्था सुरू कऱण्यासाठी कोणतीही परवानगी देण्यात आली नसल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

लॉकडाऊन उघडल्यानंतर शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काही बदल होऊ शकतात. कोणत्या पद्धती अवलंबल्या जाऊ शकतात याबद्दल जाणून घेऊया.

एका वर्गात जर 40 विद्यार्थी असतील तर एकावेळी वर्गात केवळ 20 विद्यार्थी असणं आवश्यक आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होऊ शकतं. पण असं केल्यानं शिक्षक आणि जागेची कमतरता भासू शकते.

सकाळच्या सत्रात 20 तर दुपारच्या सत्रात 20 विद्यार्थी किंवा जागेच्या उपलब्धतेनुसार विद्यार्थी संख्या ठरवावी. यामुळे दोन सत्रात शाळा सुरू करण्यात येऊ शकते.

ज्यांना शक्य आहे किंवा 50 टक्के विद्यार्थी हे वर्गात तर 50 टक्के विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीनं शिकवता यावं यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

ऑनलाईन पद्धतीमुळे शिक्षक आणि शाळेतील भासणारी जागेची कमतरता या दोन्ही समस्या दूर होतील. सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल.

कोरोना आणि लॉकडाऊनमुळे शाळांना सुट्टी देण्यात आली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे.

विद्यार्थ्यांचं नुकसान भरून काढण्यासाठी 5 ऐवजी 6 दिवसांचा आठवडा करण्यात येणार आहे. मात्र याबाबत अद्याप काही ठरवण्यात आलेले नाही.

सम आणि विषम हा फॉर्म्युला साधारण प्रदूषण रोखण्यासाठी गाड्यांना वापरण्यात येतो. पण शाळेतही वर्ग आणि एकूण अभ्यासासाठी ह्या नियमाचा अवलंब करण्याचा विचार सुरू आहे.

सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचं पालन करण्यासाठी हे महत्त्वाचं ठरू शकतं. त्याचं नियोजन कशापद्धतीनं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बर्‍याच शाळा वाहतुकीवर मर्यादा घालण्याचाही विचार करत आहेत. अशा परिस्थितीत पालकांना आपल्या मुलांना शाळेत सोडण्याची जबाबदारी घेण्यास सांगितले जाऊ शकते.

लहान मुलांना एकमेकांच्या संपर्कात येण्यापासून रोखणे सोपे नाही. स्कूल बसमध्ये हे कठीण आहे. त्यामुळे त्यावर विचार सुरू आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.