CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या संकटात आशेचा किरण! ...तर जूनमध्ये मोठा दिलासा मिळणार; 12 कोटी लसी उपलब्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 08:30 AM2021-05-31T08:30:20+5:302021-05-31T08:40:05+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates : तज्ज्ञांना जून महिन्यात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ तर नवीन रुग्ण आणि मृत्यूच्या दरात घट होण्याची अपेक्षा आहे.

देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. रविवारी कोरोनाचे 1 लाख 65 हजार 553 नवे रुग्ण आढळून आले. गेल्या 46 दिवसांतील हा नीचांक आहे. याला बळी पडणारे तसेच सक्रिय रुग्णांची संख्याही कमी झाली असून, रविवारी 3260 जणांचा मृत्यू झाला आहे.

केंद्रीय आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णांची एकूण संख्या 2 कोटी 78 लाख 94 हजार 800 असून, त्यातील 2 कोटी 54 लाख 54 हजार 320 जण बरे झाले. आतापर्यंत 3 लाख 25 हजार 972 लोकांचा मृत्यू झाला आहे.

रविवारी कोरोनातून 2 लाख 76 हजार रुग्ण बरे झाले. देशात सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून, रविवारी ती 21 लाख 14 हजार 508 होती. शनिवारी हीच संख्या 22 लाख 28 हजार 724 होती.

कोरोनाचा फैलाव कमी करण्यासाठी अनेक राज्यांनीही सध्या कडक लॉकडाऊन लागू केला आहे. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने काही राज्यांत लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल केले आहेत.

तमिळनाडू, केरळ, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या पाच राज्यांत देशातील 65.3 टक्के कोरोना रुग्ण आहेत. देश कोरोनाचा समाना करण्यासाठी सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत.

कोरोनाविरोधातील लढ्यात सध्या आशेचा किरण निर्माण झाला आहे. या महाभयंकर संकटात जून महिना काहीसा दिलासा देणारा ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक ती काळजी घेतली जात आहे.

तज्ज्ञांना जून महिन्यात कोरोनातून बरं होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ तर नवीन रुग्ण आणि मृत्यूच्या दरात घट होण्याची अपेक्षा आहे. तसेच जून महिन्यात देशाला 12 कोटींहून अधिक लसी उपलब्ध होऊन लसीकरणाचा वेगही वाढेल, असंही मानलं जात आहे.

जून महिन्यात भारतात कोरोनाविरोधातील लढ्यात महत्त्वाच्या असलेल्या लसींचे तब्बल 12 कोटी नवे डोस उपलब्ध होतील. यातील जवळपास 6.09 कोटी डोस हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर आणि लगभग 45 वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकारकडून मोफत उपलब्ध करुन दिले जातील.

5.86 कोटीहून अधिक डोस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील सरकारांशिवाय खासगी रुग्णालय थेट विकत घेऊ शकतात. भारतात गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

9 मे रोजी देशात कोरोनाचे नवे 403738 रुग्ण आढळले होते. तर, 30 मेपर्यंत हा आकडा 165553 वर आला आहे. आयआयटी कानपूर आणि हैदराबादमधील शास्त्रज्ञांनी जूनमध्ये कोरोनाची दुसरी लाट ओसरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

जून महिन्याच्या शेवटपर्यंत देशभरात कोरोनाचे दररोज 20 हजार नवे रुग्ण आढळतील. तर, जुलै महिन्यापर्यंत दुसरी लाट जवळपास पूर्णपणे ओसरेल त्यांचा असा दावा आहे. सध्या कोरोनाचा वेग मंदावताना दिसत आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, मागील एका आठवड्यापासून 24 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत घट नोंदवली जात आहे. सध्या देशात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 21.14 लाखाच्या आसपास आहे.

9 मेच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत ही संख्या 35 टक्के कमी आहे. यावेळी भारतात 37.36 लाख सक्रिय रुग्ण होते. मे महिन्याच्या सुरुवातीच्या तीन आठवड्यांमध्ये भारतात 83135 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला.

एप्रिल महिन्यातील सुरुवातीच्या तीन आठवड्यांच्या तुलनेत हा आकडा 92 टक्के अधिक होता. या काळात कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या 43258 होती. तज्ज्ञांच्या मते, मोठ्या संख्येनं आयसीयूमध्ये भरती होणं, हेच मृतांची संख्या वाढण्याचं मुख्य कारण आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होण्यासोबत मृतांच्या आकड्यातही काही प्रमाणात घट येऊ शकते. त्यामुळेच जूनमध्ये मृत्यूदरात घट होण्याची आशा आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनामुळे आतापर्यंत लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, होम आयसोलेशन, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.