Corona Virus : खळबळजनक! शाळेत कोरोनाचा स्फोट; 37 विद्यार्थिनींना लागण, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 11:02 AM2023-03-27T11:02:01+5:302023-03-27T11:19:29+5:30

Corona Virus : शाळांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला असून विद्यार्थी व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे.

देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. तसेच मृतांचा आकडा देखील वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. असं असतानाच आता ध़डकी भरवणारी माहिती समोर आली आहे.

शाळांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा विस्फोट झाला असून विद्यार्थी व्हायरसच्या विळख्यात सापडले आहे. उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. येथील एका शाळेत तब्बल 37 विद्यार्थिनी आणि एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोनाचे 41 सक्रिय रुग्ण आहेत. लखीमपूर खेरीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष गुप्ता यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, मितौली ब्लॉकच्या कस्तुरबा शाळेत कोरोनाचे 38 रुग्ण आढळले आहेत. यापैकी 37 विद्यार्थिनी आणि एक शाळेतील कर्मचारी आहे.

23 मार्च रोजी या विद्यार्थिनींना कोरोनाची लागण झाली होती. सीएमओ डॉ.संतोष गुप्ता यांच्यासह अतिरिक्त सीएमओ डॉ.अनिल गुप्ता यांनी शाळेला भेट दिली होती. सीएमओ म्हणाले की, कस्तुरबा शाळेतील 38 रुग्णांव्यतिरिक्त आणखी दोन जणांनाही कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

एक रुग्ण मितौलीचा तर दुसरा बहजम ब्लॉकचा आहे. जिल्हा डीएम महेंद्र बहादूर सिंह यांनी सांगितले की, कोरोना बाधित आढळलेल्या सर्व विद्यार्थिनी निरोगी आहेत आणि कोणत्याही प्रकारचा ताण घेण्याची गरज नाही.

अधिकाऱ्यांनी सांगितले की कोविड-संक्रमित लोकांना औषध किट उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी कस्तुरबा शाळेबाहेर एक रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. दिल्लीतही कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा दहशत माजवली आहे.

दिल्लीतील संसर्ग दरात झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी, कोरोनाचे 153 नवीन रुग्ण आढळले आणि डेली पॉझिटिव्हिटी रेट 9.13 टक्के झाला आहे. यापूर्वी शनिवारपर्यंत डेली पॉझिटिव्हिटी रेट 4.98 टक्के होता आणि 139 नवीन प्रकरणांची नोंद झाली होती. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देशातील कोरोना व्हायरस आणि फ्लूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक सूचना जारी केली आहे. या एडव्हायझरीमध्ये लोकांना कोरोनासाठी निश्चित केलेल्या सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मंत्रालयाने लोकांना गर्दीच्या आणि बंद ठिकाणी मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल/ टिश्यू वापरण्यास सांगितले आहे. हाताची स्वच्छता राखण्यासाठी, साबणाने किंवा हाताने वारंवार हात धुण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या सूचनेनुसार, टेस्टला प्रोत्साहन देण्यास आणि लक्षणांबद्दल लवकर माहिती देण्यासही सांगितले आहे. यासोबतच श्वसनाचे आजार असल्यास वैयक्तिक संपर्क मर्यादित ठेवण्याचाही सल्ला देण्यात आला आहे.

कोविड-19 ची वाढती प्रकरणे पाहता, 10 आणि 11 एप्रिल रोजी राष्ट्रीय स्तरावर याला सामोरे जाण्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात येणार आहे. मॉक ड्रिलमध्ये आयसीयू बेड, वैद्यकीय उपकरणे, ऑक्सिजन आणि मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्चित केली जाईल.

आरोग्य मंत्रालयाने 27 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांशी बैठक बोलावली आहे. या बैठकीत मॉक ड्रिलशी संबंधित सर्व माहिती शेअर केली जाणार आहे. कोविड-19 मधून बरे होण्याचे प्रमाण 98.79 टक्के आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.