CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोना लसीचे 2 डोस घेतल्यावरही रुग्णालयातील 352 कर्मचारी पॉझिटिव्ह; आरोग्य विभागात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 02:21 PM2022-01-08T14:21:07+5:302022-01-08T14:41:29+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर झाली आहे. देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. गेल्या 24 तासांत रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून धडकी भरवणारी आकडेवारी समोर आली आहे.

कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची एकूण संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. तर दुसरीकडे ओमायक्रॉन रुग्णांचा आकडा देखील दिवसागणिक वाढत आहे. 27 राज्यांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून एकूण रुग्णसंख्येने आता तीन हजारांचा टप्पा पार केला आहे.

देशातील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 3,071 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये सर्वाधिक रुग्ण असून या राज्यांनी टेन्शन वाढवलं आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

शनिवारी (8 जानेवारी) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1,41,986 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 4,83,463 वर पोहोचला आहे. देशातील कोरोनाग्रस्तांपैकी 4,72,169 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 3,44,12,740 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही अनेकांना कोरोनाची लागण होत आहेत. 2 डोस घेतल्यावरही रुग्णालयातील 352 कर्मचारी पॉझिटिव्ह आले आहेत.

चंदीगडच्या PGI रुग्णालयातील तब्बल 352 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.

पोस्टग्रेजुएट इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च (PGIMIR) मध्ये 20 डिसेंबरपासून आतापर्यंत 152 डॉक्टरांसह 352 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामधील अनेकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

पॉझिटिव्ह आढळून आलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाची हलकी लक्षणं आढळून येत आहेत. या सर्वांना नेहरू रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

पंजाबमधील अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इटलीहून आलेल्या एका विमानातील 125 प्रवासी कोरोना संक्रमित आढळून आले आहेत. या विमानात एकूण 179 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.

सर्व प्रवाशांना अमृतसरमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इटलीहून देशात आलेल्या या प्रवाशांपैकी 13 कोरोना पॉझिटिव्ह प्रवासी रुग्णालयातून पळून गेले आहेत.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सर्व लोकांनी आरोग्य अधिकाऱ्यांची नजर चुकवून पळ काढला आहे. भारतात आलेल्या सर्व कोरोनाबाधित प्रवाशांना गुरु नानक देव रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 13 कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.

पळून गेलेल्या सर्वांचे पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे. अमृतसरचे डिप्युटी कमिश्नर गुरप्रीत सिंह खेड़ा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जर पळून गेलेले प्रवासी परत आले नाहीत, तर त्यांचे फोटो वर्तमानपत्रात छापले जातील आणि त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात येईल.

"आम्ही आमच्या राज्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत, अशा परिस्थितीत प्रवाशांचा असा निष्काळजीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही" असं देखील त्यांनी म्हटलं आहे.