Corona Vaccination: कोविशील्डचा बूस्टर डोस कधी घ्यायचा?; पुनावालांनी सांगितली 'नेमकी' वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 02:21 PM2021-08-14T14:21:58+5:302021-08-14T14:26:49+5:30

Corona Vaccination: सीरमच्या अध्यक्षांनी सांगितला दोन डोसमधील आदर्श कालावधी आणि तिसऱ्या डोसची गरज

देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून देशात दररोज ५० हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार काहीसा कमी झाला आहे.

कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिसरी लाट येऊ शकते अशी भीती व्यक्त होत आहे. कोरोनाच्या लाटेचा तडाखा कमी करण्यासाठी लसीकरणाला वेग देण्याची गरज आहे.

देशात सुरू असलेल्या लसीकरण अभियानात सर्वाधिक वापर कोविशील्डचा सुरू आहे. मात्र कोविशील्डची लस घेतल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत अँटिबॉडीज कमी होत असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.

जगातील अनेक देशांनी कोरोना लसीच्या बूस्टर डोसला परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. आता यावर पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पुनावालांनी भाष्य केलं आहे.

कोविशील्डच्या दोन डोसमधील अंतर सध्या ८४ दिवसांचं आहे. मात्र ते २ महिनेच असायला हवं, असं पुनावाला म्हणाले. कोविशील्डचे दोन डोस घेतल्यानंतर ६ महिन्यांनी तिसरा डोस (बूस्टर डोस) घ्यायला हवा, असंही पुनावालांनी सांगितलं.

कोविशील्डची लस घेतल्यानंतर पुढील २ ते ३ महिन्यांत अँटिबॉडीज ५० टक्क्यांपर्यंत होऊ शकतात, अशी माहिती २ आठवड्यांपूर्वी लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झाली. त्याबद्दल पुनावालांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अँटिबॉडीज कमी होतात ही बाब खरी आहे. पण मेमोरी सेल्स कायम राहतात, असं पुनावाला म्हणाले.

बूस्टर डोसची आवश्यकता अधोरेखित करत असताना पुनावालांनी स्वत:चं उदाहरण दिलं. '६ महिन्यांनंतर अँटिबॉडीज कमी होतात. त्यामुळेच मी तिसरा डोस घेतला आहे,' असं पुनावालांनी सांगितलं.

आम्ही जवळपास ८ हजार कर्मचाऱ्यांना तिसरा डोस दिला आहे. ज्या व्यक्तींनी कोविशील्डचे २ डोस घेतलेत, त्यांनी ६ महिन्यांनंतर बूस्टर डोस नक्की घ्यावा, असं आवाहन पुनावालांनी केलं.

दोन डोसमधील अंतर किती असावं यावरही पुनावालांनी भाष्य केलं. लसींचा साठा कमी असल्यानं सरकारनं दोन डोसमधील कालावधी ३ महिने केला. मात्र दोन डोसमधील आदर्श अंतर २ महिने आहे, असं पुनावाला म्हणाले.

कोविशील्ड लसीसाठी ऑक्सफर्ड आणि ऍस्ट्राझेनेकानं संशोधन केलं आहे. लसीच्या उत्पादनासाठी त्यांनी सीरमशी करार केला. सीरम भारतात कोविशील्ड नावानं देत असलेली लस युरोपीय देशांमध्ये ऍस्ट्राझेनेका नावानं ओळखली जाते.